फडणवीस सरकारपुढे मोठे आव्हान
By Admin | Updated: November 29, 2014 00:37 IST2014-11-29T00:37:36+5:302014-11-29T00:37:36+5:30
आघाडीच्या सरकारपेक्षा वेगळेपण फडणवीस सरकारला सिद्ध करून दाखवायचे आहे. हेच या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी व्यक्त केले.

फडणवीस सरकारपुढे मोठे आव्हान
मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा होता आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या जनभावनेचे चित्र दिसून आले. आता कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारपेक्षा वेगळेपण फडणवीस सरकारला सिद्ध करून दाखवायचे आहे. हेच या सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी व्यक्त केले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आयोजित ‘गुरुवार सभा’ उपक्रमांतर्गत व्याख्यानात ‘नव्या सरकारपुढील आव्हाने’ विषयावर आपले विचार मांडताना रायकर यांनी जुन्या राजवटीतील परिस्थितीचा आढावा घेतला. विधानसभेत बहुमत सिद्ध करणो हा सरकारसमोरील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या कुबडय़ा वापरून सरकार फार काळ तग धरू शकणार नाही. पवारांना आपला पक्ष सध्या स्थिरस्थावर करायचा आहे. झालेली पडझड दुरुस्त करून निवडणुकांना तोंड देण्याइतपत तयारी करण्यासाठी पवारांना उसंत हवी आहे. तेवढा वेळ काढण्यापुरताच पवारांनी नव्या सरकारला पाठिंबा दिला आहे. पवारांचा धूर्तपणा लक्षात घेता देवेंद्र फडणवीस सरकारला त्यांच्या भरवशावर फार काळ अवलंबून चालणार नाही, असे ते म्हणाले.
शिवसेना आणि भाजपा यांच्यात चालू असलेल्या चर्चेच्या गु:हाळाचा लोकांना कंटाळा आला आहे. या दोन्ही पक्षांनी एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून निर्णय घ्यावा, असे सांगून रायकर म्हणाले की, राष्ट्रवादी-कॉँग्रेसपेक्षा शिवसेनेचा पाठिंबा घेणो सरकारला केव्हाही अधिक सोयीचे व हितकारक ठरेल. दिवंगत बाळासाहेब ठाकरे किंवा गोपीनाथ मुंडे हे दोन्ही नेते आज असते तर आज ही अस्थिर स्थिती निर्माण झालीच नसती. या दोन्ही नेत्यांनी कमीत कमी वेळात निर्णय घेतला असता, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळ आणि बिघडलेली आर्थिक स्थिती हे दोन महत्त्वाचे प्रश्न सध्या नव्या सरकारला हाताळावे लागणार आहेत. दुष्काळाचा प्रश्न उग्र होत असून सध्या विरोधात असलेली शिवसेना या प्रश्नावर वातावरण तापवीत आहे. अशा स्थितीत जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा वेळी धडाडीने निर्णय घेऊन सरकारने आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले पाहिजे, असे रायकर म्हणाले. (प्रतिनिधी)