राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला मोठा झटका

By Admin | Updated: February 19, 2015 00:06 IST2015-02-19T00:06:52+5:302015-02-19T00:06:52+5:30

कार्यकर्ते चिंतेत : आर. आर. पाटील यांच्या निधनाने जिल्ह्यात पक्षांतर्गत मोठी पोकळी

A big blow to NCP's existence | राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला मोठा झटका

राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला मोठा झटका

सांगली : पक्षांतर्गत कुरघोड्या, भाजपची आलेली लाट अशा प्रतिकूल परिस्थितीतही आर. आर. पाटील आणि जयंत पाटील या दोन दिग्गज नेत्यांच्या जोरावर जिल्ह्यात राष्ट्रवादीने आपला गड सांभाळला होता. आर. आर. पाटील यांच्या निधनाने राष्ट्रवादीचा एक बुरूज ढासळल्याने पक्षाच्या जिल्ह्यातील अस्तित्वाला मोठा झटका बसला आहे. आबांवर प्रेम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आता चिंताग्रस्त बनले आहेत. ही पोकळी भरून काढणे तितके सोपे नसल्याने पक्षाच्या भवितव्याची चिंता आतापासूनच व्यक्त होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सांगली जिल्ह्यात या पक्षाकडे दिग्गज नेत्यांची फळी होती. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, विधानसभा अशा प्रत्येक ठिकाणी पक्षाची ताकद वाढत गेली. कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या ताकदीमुळेच पक्षाची ताकद वाढली. कॉँग्रेसकडून एकापाठोपाठ एक संस्था राष्ट्रवादीने काबीज केल्या. राष्ट्रवादीने आपला गड मजबूत केला. आर. आर. पाटील आणि जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. सुरुवातीच्या टप्प्यात मदन पाटीलही या नेत्यांच्या जोडीला होते; मात्र नंतर त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि जिल्ह्यातील पक्षाची धुरा या दोन दिग्गज नेत्यांनी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाला पोषक असे दुसऱ्या फळीतील दिग्गज नेतेही जिल्ह्यात होते. आर. आर. आणि जयंतरावांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी प्रत्येक तालुक्यात आणि गावागावात आहे. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीला अनेक झटके बसले. अनेक तालुक्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पक्षाला सोडून अन्य पक्षात गेले. भाजप आणि शिवसेनेची ताकद राष्ट्रवादी सोडून आलेल्या नेत्यांमुळेच वाढली. त्यातच पुन्हा मोदी लाटेची भर पडली. प्रतिकूल परिस्थितीत पक्षाच्या अस्तित्वाची चिंता व्यक्त होत असतानाच या दोन्ही नेत्यांनी स्वत:च्या ताकदीवर गड राखले. पक्षाच्या अस्तित्वाची चिंता लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू झाली होती. विधानसभेनंतर त्यात आणखी भर पडली. पक्षाच्या जागा कमी झाल्या होत्या. तरीही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या दोन नेत्यांमुळे निश्चिंत होते. आबांच्या निधनाने आता पुन्हा पक्षात चिंतेचे वारे वाहू लागले आहे. आबांच्या निधनाचा फटका किती मोठा आहे, याची कल्पना ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांना आहे. त्यांची उणीव कोणी भरून काढेल की नाही, याचे उत्तर सध्यस्थितीत कोणाकडेही नाही. कार्यकर्त्यांमधून आतापासूनच याबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे. आबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांच्या पक्षीय कामकाजात मोठा फरक आहे. मध्यंतरी याच भिन्नतेमुळे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीपासून पक्षीय पदांच्या निवडीमध्येही दोन्ही नेत्यांना एकमेकांच्या समन्वयाने निर्णय घ्यावा लागला होता. जयंत पाटील यांच्यात जिल्ह्याच्या नेतृत्वाची ताकद आहे. तरीही आबांच्या विरोधात काम करणारे अनेक नेते त्यांच्या जवळ असल्याने यापुढील काळात ते या सर्व गोष्टींमधून कसा मार्ग काढणार, यावर साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. तारेवरची कसरत जयंतरावांपासून आबांना मानणाऱ्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचीच आहे. तालुक्यातच अस्थिरता अधिक... आबांच्या निधनाने त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेता म्हणून आता कोणाकडे पहायचे, प्रश्न घेऊन कोणाकडे जायचे, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले आहेत. तालुक्यातील त्यांचा गट सर्वाधिक चिंताग्रस्त झाला आहे. तालुक्यात दुसऱ्या फळीत आबांइतका सक्षम नेता नसल्याने त्यांना आता भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. कार्यकर्त्यांमधून नेते घडविण्याचे प्रयत्न थांबले... अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर आर. आर. पाटील यांनी या गोष्टीवर संताप व्यक्त केला होता. नेत्यांची उसनवारी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांमधून नेते घडवून दाखवू, असा निर्धार त्यांनी विधानसभा निवडणुकीत व्यक्त केला होता. त्यादृष्टीने जिल्ह्यातील निष्ठावंत व अभ्यासू कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या निधनाने हे काम आता थांबले आहे. आर. आर. पाटील, जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांनी प्रदीर्घ काळ राज्याच्या राजकारणात दबदबा ठेवला. त्यामुळे जिल्ह्यातील या तिन्ही नेत्यांना राज्यात सर्वत्र त्रिमूर्ती असे म्हटले जायचे. जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नाबाबत पक्षीय बंधन न पाळता हे तिन्ही नेते एकत्र येत होते. आता आबांच्या निधनाने ही ताकदही घटली आहे.

Web Title: A big blow to NCP's existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.