रेल्वे कर्मचार्याच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना
By Admin | Updated: June 8, 2014 23:18 IST2014-06-08T23:17:23+5:302014-06-08T23:18:08+5:30
मूर्तिजापूर स्थानकावरून रवाना झालेली कुर्ला हावडा शालीमार एक्स्प्रेसची बोगी क्षतिग्रस्त; दुर्घटना टळली.

रेल्वे कर्मचार्याच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर स्थानकावरून नागपूरच्या दिशेने रवाना झालेल्या 18029 डाऊन कुर्ला हावडा शालीमार एक्स्प्रेसची एस-१ ही बोगी क्षतिग्रस्त असल्याचे रेल्वे कर्मचार्याच्या लक्षात येताच त्वरित थांबविण्यात आली व पुढील मोठा अनर्थ टळला. दोन तासांच्या अवधीनंतर मूर्तिजापूर स्थानकावर थांबलेल्या शालीमार एक्स्प्रेसची क्षतिग्रस्त बोगी गाडीपासून विलग करण्यात आली व त्यानंतर गाडी नागपूरकडे रवाना झाली. कुर्ला हावडा शालीमार एक्स्प्रेसने अकोला रेल्वे स्थानक सोडल्यानंतर सकाळी ९.१३ वाजता मूर्तिजापूर रेल्वे स्थानक गाठले. तीन मिनिटांच्या अंतराने ९.१५ वाजता गाडी नागपूरच्या दिशेने रवाना झाली खरी, पण धिम्या गतीने पुढे सरकणार्या गाडीची ह्यएस-१ह्ण या बोगीखालील चाकांजवळील भाग क्षतिग्रस्त होऊन त्यास तडा गेल्याची बाब सीएनडब्यू टेक्निशियन विजय नाईक यांच्या निदर्शनास आली. तत्काळ नाईक यांनी सदर गंभीर बाब मूर्तिजापूरचे स्टेशन मास्तरांच्या लक्षात आणून दिली. त्याच तत्परतेने स्टेशन मास्तरांनी गाडीला रेड सिग्नल दाखविण्याचे आदेश देऊन गाडी थांबविली. इर्मजन्सी ब्रेकमुळे क्षणार्धात थांबलेली शालीमार एक्स्प्रेस परत मागे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आणण्यात आली. यानंतर ११.१0 वाजता ही गाडी नागपूरच्या दिशेने रवाना झाली.
**हाटिया एक्स्प्रेसला विलंब सदर घटनेमुळे मागाहून येणार्या हाटिया एक्स्प्रेसलासुद्धा सिग्नल न मिळाल्याने मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाबाहेर दोन तास थांबून रहावे लागले. यामुळे दररोज अप-डाऊन करणार्या प्रवाशांना मूर्तिजापूर थांबा नसलेल्या हाटिया एक्स्प्रेसने प्रवास करण्याची संधी मिळाली.
**रेल्वे कर्मचार्याचे प्रसंगावधान
मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरून निघणार्या गाड्यांच्या निरीक्षणाची जबाबदारी पार पाडणार्या सीएनडब्यू टेक्निशियन विजय नाईक यांच्या प्रसंगावधानामुळे क्षतिग्रस्त बोगी घेऊन धावणार्या शालीमार एक्स्प्रेसची संभाव्य दुर्घटना टळली. ही बाब लक्षात आली नसती तर मोठी प्राणहानी घडली असती. दैव बलवत्तर म्हणून बचावलो असे म्हणत अनेक प्रवाशांनी विजय नाईक यांचे आभार मानलेत.