हेल्मेट न घातल्यामुळे पुण्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू
By Admin | Updated: February 7, 2016 13:57 IST2016-02-07T11:16:56+5:302016-02-07T13:57:04+5:30
पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध होत असताना पुण्याच्या विश्रामवाडी परिसरात एका दुचाकीस्वाराचा हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

हेल्मेट न घातल्यामुळे पुण्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ७ - पुण्यात सर्वपक्षीय राजकीय नेते हेल्मेटसक्तीला विरोध करत असताना पुण्याच्या विश्रामवाडी परिसरात एका दुचाकीस्वाराचा हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पुण्याच्या विश्रामवाडीमध्ये शनिवारी रात्री एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले नसल्यामुळे डोक्याला मार लागून मृत्यू झाला.
या दुचाकीस्वाराचे नाव समजू शकलेले नाही. हा दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला तेव्हा त्याच्या शरीरावर डोक्याचा भाग वगळता अन्यत्र कुठेही इजा झालेली नव्हती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मागच्यावर्षी पुण्यात दुचाकीच्या अपघातात १०० पेक्षा जास्त मृत्यू झाल्याचे एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने सांगितले.
पुण्यात सध्या दुचाकीस्वाराला करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीवरुन राजकारण सुरु आहे. सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन या हेल्मेट सक्तीला विरोध करत आहेत. यासाठी पुण्यात आंदोलने सुरु आहेत.
दुचाकी चालवणारा चालक आणि मागे बसणारा दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती शनिवारपासून राज्यभरात लागू करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याच्या परिवहन आयुक्तांनी सांगितले.