भुजबळांच्या अवैध मालमत्तेची चौकशी
By Admin | Updated: February 18, 2015 03:00 IST2015-02-18T03:00:37+5:302015-02-18T03:00:37+5:30
२ हजार ५२० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची खुुली चौकशी करण्याची अनुमती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली

भुजबळांच्या अवैध मालमत्तेची चौकशी
फाइल गृृह विभागाकडे : २ हजार कोटींचा मामला
यदु जोशी- मुंबई
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जमा केलेल्या २ हजार ५२० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची खुुली चौकशी करण्याची अनुमती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली असून, या संदर्भात मुख्यमंत्री एक-दोन दिवसांत निर्णय घेतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
माजी मंत्री भुजबळ, त्यांचे पुत्र आमदार पंकज आणि पुतणे समीर तसेच अन्य काही नातेवाइकांनी २ हजार ५२० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया आणि सामाजिक कार्यकर्ते संजीव खांडेकर यांनी या मालमत्तेसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीत त्यांनी भुजबळ कुटुंबाने जमविलेल्या संपत्तीचा इत्थंभूत तपशील दिला होता. बेहिशेबी मालमत्ता
किती आणि कशी जमविली, पदाचा दुरुपयोग कसा केला याची माहितीही देण्यात आली होती.
यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्यमंत्र्यांकडे खुल्या चौकशीची मागणी केली असून, संबंधित फाइल गृह विभागाकडे पोहोचली आहे.
आधी महाराष्ट्र सदन, आता बेहिशेबी मालमत्ता
च्एसीबीने मागणी केलेल्या चौकशीला मुख्यमंत्री कुठल्याही क्षणी हिरवा कंदील देतील, असे सूत्रांनी सांगितले.
च्दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी भुजबळ यांची एसीबीमार्फत चौकशी करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या डिसेंबरमध्येच मान्यता दिली असून, ती चौकशी सध्या सुरू आहे.
च्आता बेहिशेबी मालमत्तेची चौकशी होणार असल्याने भुजबळ यांच्यापुढील अडचणीत वाढ होणार आहे.
तक्रारीतील कंपन्यांची नावे
दमानिया यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये आर्मस्ट्राँग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., भुजबळ वाइन्स, इंटेलेक्च्युअल मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रा.लि., बावेश बिल्डर्स प्रा.लि., आर्मस्ट्राँग प्युअर वॉटर प्रा.लि., जय इलेक्ट्रॉनिक प्रा.लि., सुवि रबर प्रा.लि., देविशा इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रोथ इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., उन्नती रिएल्टर्स आदी २० कंपन्यांच्या नावे असलेल्या संपत्तीचे विवरण देण्यात आले आहे.
पैसा ‘पांढरा’ करण्याचा कोलकाता पॅटर्न
भुजबळ आणि कुटुंबीयांनी काळापैसा पांढरा करण्यासाठी ‘कोलकाता पॅटर्न’चा वापर केल्याचे दमानिया यांनी तक्रारीत म्हटले आहे.
20 पेक्षा अधिक कंपन्यांची स्थापना भुजबळ कुटुंबीयांनी केली. छुप्या वा बनावट कंपन्यांद्वारे आपल्या कंपन्यांचे समभाग खरेदी केले गेले. या कंपन्यांच्या समभागाचे दर्शनी मूल्य १०० रुपये इतके होते. पण प्रति समभाग ९,९०० रुपये या भावाने हे शेअर्स जारी केल्याचे दमानिया यांनी तक्रारीत म्हटले आहे.
भुजबळ बंधुंची चौकशी होणार
महाराष्ट्र सदनप्रकरणी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर, पुत्र पंकज यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व अंमलबजाबवणी महासंचालनालय (ईडी) चौकशी करणार.