भुजबळ कुटुंबाची एसीबी चौकशी
By Admin | Updated: February 22, 2015 02:32 IST2015-02-22T02:32:30+5:302015-02-22T02:32:30+5:30
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या काही वर्षांत गोळा केलेल्या सुमारे २,५०० कोटी रुपयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची खुली चौकशी होणार आहे.

भुजबळ कुटुंबाची एसीबी चौकशी
गृह विभागाची मान्यता
यदु जोशी - मुंबई
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या काही वर्षांत गोळा केलेल्या सुमारे २,५०० कोटी रुपयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची खुली चौकशी करण्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) विनंती राज्याच्या गृह विभागाने मान्य केली असून, आता अंतिम निर्णयासाठी फाइल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली.
स्वत: भुजबळ, त्यांचे पुत्र आमदार पंकज, पुतणे समीर भुजबळ यांच्यासह आणखी काही नातेवाइकांची या बेहिशेबी मालमत्तेबाबत खुली चौकशी करण्याची परवानगी एसीबीने सरकारकडे मागितली होती. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी ही मान्यता दिल्यानंतर शुक्रवारी ही फाइल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पोचली
आहे.
एसीबीकडून चौकशीसाठी आलेली कोणतीही फाइल आपण पेंडिंग ठेवत नाही, असे फडणवीस वारंवार सांगत आले आहेत. त्यामुळेच आता ते भुजबळ यांच्या फाइलबाबत कधी आणि काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे. एसीबीने खुल्या चौकशीची परवानगी मागितल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १८ फेब्रुवारीच्या
अंकात दिले होते.