भुजबळांना क्लीन चिट नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
By Admin | Updated: December 22, 2015 08:53 IST2015-12-22T03:10:47+5:302015-12-22T08:53:27+5:30
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ वा अन्य कोणालाही राज्य शासनाने क्लीन चिट दिलेली नाही,
भुजबळांना क्लीन चिट नाही; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
नागपूर : दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ वा अन्य कोणालाही राज्य शासनाने क्लीन चिट दिलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
भुजबळ यांना क्लीन चिट दिली असल्याचे वृत्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अहवालाच्या आधारे देण्यात आले होते. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) करीत असून ती सुरूच आहे.
चौकशीला सामोरे जात असलेले भुजबळ आणि अन्य काही जणांना एसीबीकडून प्रश्नावली देण्यात आली
होती. त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कोणाला क्लीन चिट देण्याचा प्रश्नच येत नाही.
विधान परिषदेसाठी खुले मतदान
विधान परिषदेच्या काही निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीप्रमाणे हात वर करून मतदान झाले पाहिजे. यासाठी ज्या राज्यांमध्ये विधान परिषदेसाठी गुप्त मतदान होते अशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असेही फडणवीस म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)