भुजबळांंना क्लीन चिट नाही - मुख्यमंत्री
By Admin | Updated: January 14, 2016 04:13 IST2016-01-14T04:13:44+5:302016-01-14T04:13:44+5:30
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन वा अन्य कोणत्याही प्रकरणात राज्य शासनाने क्लीन चिट दिलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

भुजबळांंना क्लीन चिट नाही - मुख्यमंत्री
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन वा अन्य कोणत्याही प्रकरणात राज्य शासनाने क्लीन चिट दिलेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.
भुजबळ यांच्या चौकशीबाबत शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मला पत्र पाठवल्याचे मी वाचले आहे; परंतु मी ते पत्र अजून पाहिले नाही, असे ते म्हणाले. दिल्लीतील महाराष्ट्र सदन व कलिना मध्यवर्ती ग्रंथालयाच्या जागेच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मंत्री भुजबळ यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी थांबविण्यात आलेली नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना क्लीन चिट दिली असल्याच्या वृत्ताकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. (विशेष प्रतिनिधी)
मी राष्ट्रवादीतच
छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याच्या वृत्ताचा स्वत: भुजबळ यांनीच इन्कार केला. ते म्हणाले की, माझी बांधकाम विभागाशी संबंधित प्रकरणावर खा.संजय राऊत वा अन्य कोणत्याही सेना नेत्याशी चर्चा झालेली नाही. बांधकाम खात्याच्या अहवालात मी दोषी नाही, हेच म्हटलेले आहे. त्यावर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि विभागाच्या सचिवांच्या सह्या आहेत.