‘कृष्णा’काठचे भोसले बाई ‘कमळा’त गुंतले!

By Admin | Updated: September 25, 2014 00:29 IST2014-09-24T23:30:35+5:302014-09-25T00:29:59+5:30

लगाव बत्ती--

Bhosle Bai from 'Krishna' is engaged in 'Kamala'! | ‘कृष्णा’काठचे भोसले बाई ‘कमळा’त गुंतले!

‘कृष्णा’काठचे भोसले बाई ‘कमळा’त गुंतले!

सातारा जिल्हा म्हणे काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पूर्वी असायचा. मात्र, याच बालेकिल्ल्यात भाजप-सेनेला ‘अच्छे दिन’ आलेत. किल्ल्यावरचे मावळे अन् सरदार एकेक करून खाली उतरू लागलेत. येत्या दोन-तीन दिवसांत तर म्हणे सुरुंगाचं कोठार उडवलं जाणारंय. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ‘कऱ्हाड दक्षिण’च्या मैदानात तगडा प्रतिस्पर्धी देण्याचा वादा भाजपवाल्यांनी केला होता. तो शब्द अखेर त्यांनी खरा करून दाखविलाय. भोसलेंच्या अतुलबाबांना अलगद आपल्या गोटात घेऊन भाजपनं एकाचवेळी पृथ्वीराजबाबा अन् विलासकाका यांना प्रतिशह देण्याचा प्रयत्न केलाय. ‘कृष्णा’काठी कमळ फुलविण्याचा चंग भलताच जिद्दीला पेटलाय. याच हट्टापायी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा थेट कऱ्हाडात घेण्याचं नियोजन सुरू झालंय.
कऱ्हाडातल्या ‘कृष्णा’काठचे भोसले अखेर ‘ओपन’ झाले; पण वाईतल्या ‘कृष्णा’काठच्या भोसलेंचं घोडं कुठं अडकलंय कुणास ठाऊक़ अरुण जेटलींसारख्या केंद्रीय नेत्यांसोबत तीन-तीन गुप्त बैठका घेऊनही ‘जाहीर प्रसिद्धीकरण’चा मुहूर्त का पुढं ढकलला जातोय, हे केवळ ‘दादां’नाच माहीत. कदाचित ‘उमेदवारी यादी प्रसिद्धी’ अन् ‘भाजपप्रवेश’चा बार एकदाच उडवायचा असावा. कदाचित अमितभार्इंच्या हातून प्रवेश व्हावा, अशीही इच्छा असावी. खरंतर, वाई मतदारसंघ सेनेचा. ‘दादां’नी धनुष्यबाण हातात घेतलं असतं, तर त्यांच्या उमेदवारीची घोषणा केव्हाच झाली असती. प्रचाराचा पहिला टप्पाही संपला असता; पण दादा पडले साखर कारखानदार. या धंद्यातले ‘प्रॉब्लेम’ सोडवायला राज्यापेक्षा केंद्रातलं सरकार कधीही फायद्याचं, याचा सारासार विचार करूनच म्हणे त्यांनी ‘देर से सही लेकिन कमलही सही’ ठरवलंय. तुम्ही आता म्हणाल, मग ‘हिलस्टेशन’वाल्या बावळेकरांचं काय? त्यांना महामंडळाचं लाल दिवा मिळाल्याशी मतलब, बाकी काय?
कोरेगावात खटावच्या महेश शिंदेंना ‘लॉन्च’ करण्यात म्हणे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाच अधिक इंटरेस्ट. अमितभार्इंसोबत महेशरावांच्या कैक बैठकाही झालेल्या. माण-खटावमध्ये रणजितभैय्यांसाठी एक सुप्रसिद्ध ‘महाराज’ जोरदार प्रयत्नात. तिथं ‘रासपचे शेखर’ की ‘भाजपचे रणजित’ हाच प्रश्न शिल्लक राहिलेला. असो.
साताऱ्यात दीपक पवारांनीही काल ‘कमळाचा सुगंध’ घेतलेला. त्यामुळं दत्ताजी अन् सुवर्णातार्इंचे चेहरे पडलेले. दोन दिवसांत अर्ज भरतो म्हणणारे दगडू सपकाळही अजून कुठं न दिसलेले. ‘दीपक, दगडू अन् दत्ताजी’ या तीन ‘डी’ कंपनीकडं बाबाराजेंच्या कार्यकर्त्यांचं बारीक लक्ष लागून राहिलेलं. तिसऱ्या ‘डी’ला तिकीट मिळालं, तर यंदा कितीचं लीड जास्त घ्यायचं, याचा हिशोब म्हणे आत्तापासूनच ‘बंगल्या’वर सुरू झालेला. सर्वांत कहर म्हणजे, साताऱ्यातली ही ‘गोळाबेरीज’ भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानेच त्यांनी ‘जावळी’त पक्षाचा ‘दीपक’ लावलेला. जाता-जाता अजून एक :- बाबाराजेंच्या विरोधात कुणी का असेना, त्याला बाकीच्या सर्व विरोधकांनी एकत्रित सपोर्ट करण्याची व्यूहरचना राजेंद्र चोरगेंनी आखलीय, बरं का!


सचिन जवळकोटे

Web Title: Bhosle Bai from 'Krishna' is engaged in 'Kamala'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.