बाबासाहेबांच्या स्मारकाचे १४ एप्रिलला भूमिपूजन
By Admin | Updated: December 1, 2014 02:32 IST2014-12-01T02:32:25+5:302014-12-01T02:32:25+5:30
राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली.

बाबासाहेबांच्या स्मारकाचे १४ एप्रिलला भूमिपूजन
मुंबई : राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली.
स्मारकाप्रकरणी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल भाजपा सरकारचे आभार मानण्यासाठी आज सायंकाळी दादरच्या इंदू मिलजवळ सामिजक समता मंचच्या वतीने राजव्यापी मेळाव्याचे आयोजन सामाजिक समता मंचचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांनी केले होते.
या वेळी तावडे म्हणाले की, स्मारकासाठी केंद्र सरकारला साधे ‘अंडरटेंकिंग’चे पत्रही पूर्वीच्या सरकारने दिले नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते केंद्राला दिल्याने पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण
होईल. स्मारकासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे
मागे घेण्याची मागणी वेळोवेळी होत आहे.
आघाडी सरकारने या मागणीकडे कायम दुर्लक्ष केले. कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशीष शेलार, आ. भाई गिरकर यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत उभारण्यासाठी कांबळे यांनी अरबी समुद्रात १०० एकर भरणी करावी, या मागणीसाठी सर्वप्रथम १९९८ ला अरबी समुद्रात मूठभर माती टाकण्याचे आंदोलन छेडले होते. स्मारकाच्या उभारणीसाठी राज्यातील ४०० खेड्यांमधून जनजागृती, आंदोलने व मोर्चे काढले होते, अशी माहिती कांबळे यांनी या वेळी दिली. (प्रतिनिधी)
> नव्या सरकारने ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक लवकर उभारण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करावी ही सामिजक समता मंचचच्या मागणीचे स्मरण सरकारला देण्यासाठी दादर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, असे ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांनी सांगितले.