‘भाऊ’, ‘शेख’च्या गाड्या जप्त
By Admin | Updated: November 23, 2014 00:41 IST2014-11-23T00:41:09+5:302014-11-23T00:41:09+5:30
वाहनांवर नंबर टाकताना तो एका विशिष्ट आकारात टाकण्यात यावा, असा नियम आहे. मात्र अनेक वाहनधारक याकडे दुर्लक्ष करीत होते. दादा , भाऊ, मामा , काका, शेख, मोदी, शरद, पवार, दारू या सारखी अक्षरे

‘भाऊ’, ‘शेख’च्या गाड्या जप्त
आरटीओ : चित्रविचित्र नंबर प्लेटवर कारवाई
नागपूर : वाहनांवर नंबर टाकताना तो एका विशिष्ट आकारात टाकण्यात यावा, असा नियम आहे. मात्र अनेक वाहनधारक याकडे दुर्लक्ष करीत होते. दादा , भाऊ, मामा , काका, शेख, मोदी, शरद, पवार, दारू या सारखी अक्षरे अंकांतून नंबरप्लेटवर झळकविण्याचे फॅड वाढले होते. ‘लोकमत’ने या विषयी छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने याची दखल घेत अशा नंबरप्लेटच्या वाहनांवर जप्तीची कारवाई हाती घेतली. दुचाकी वाहनांवर नंबर टाकताना समोरच्या नंबर प्लेटवरील अक्षरे व अंकांची जाडी पाच मिलिमीटर तर उंची ३० मिलिमीटर असावी. दोन अक्षरांमधील अंतर हे पाच मिलिमीटर असावे. मागील नंबर प्लेटवरील अक्षरे व अंकांची जाडी सात मिलिमीटर, उंची ३५ मिलिमीटर असावी. चारचाकी वाहनांच्या पुढील व मागील नंबर प्लेटवरील अक्षरे व अंकांची जाडी १० मिलिमीटर, उंची ६५ मिलिमीटर असावी. दोन अक्षरांमधील अंतर हे १० मिलिमीटर असावे, असा नियम आहे.
वाहतूक नियमांना तिलांजली
नियमांकडे दुर्लक्ष करीत वाहनचालक हवे त्या अक्षरासाठी इंग्रजी, मराठी अंकाचा वापर पाहिजे तसा करीत होते. यामुळे नंबर प्लेटवर नंबर कोणता, असा प्रश्न सामान्यांना पडत होता.
आरटीओ, शहर कार्यालयाने रोड सेफ्टी अॅक्टनुसार चालक-मालकाकडून अडीच हजार रुपये शुल्क आकारणे सुरू केले होते, मात्र तरीही अशा नंबरप्लेटची वाहने रस्त्यावर दिसून येत होती. ‘लोकमत’ने या संदर्भात १९ नोव्हेंबर रोजी विविध चौकातून धावत असलेल्या चित्रविचित्र नंबर प्लेटचे छायाचित्रासह वृत्त प्रकाशित केले. याची दखल आरटीओने घेऊन वाहने जप्तीची मोहीम हाती घेतली.
यात एका नगरसेवकाच्या भावाची नंबरप्लेटवर ‘भाऊ’ लिहिलेल्या वाहनासह ‘शेख’, ‘जाणता राजा’ या सारखी वाहने जप्त करण्यात आली.
कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जप्त वाहनांची नंबर प्लेट दुरुस्त केल्यानंतर व त्यांच्याकडून दंड आकारल्यानंतर सोडण्यात आले. (प्रतिनिधी)