मतदारांना सहली, भांड्यांचे वाटपासह भोजनावळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2017 14:15 IST2017-01-29T14:15:43+5:302017-01-29T14:15:43+5:30
इच्छुक आपल्या परीने नवनवीन आखाडे तयार करीत हरप्रकारे मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना प्रलोभने देत आहेत.

मतदारांना सहली, भांड्यांचे वाटपासह भोजनावळी
नाशिक : अवघ्या २४ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या ३१ प्रभागातील निवडणुकीदरम्यान करडी नजर ठेवण्याकरिता शासकीय यंत्रणा कार्यरत असली तरी चाणाक्ष इच्छुक आपल्या परीने नवनवीन आखाडे तयार करीत हरप्रकारे मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना प्रलोभने देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिनदर्शिकांपासून भांड्यापर्यंत वाटप सुरू असताना आचारसंहिता कक्ष मात्र काय करतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कधीही कॅलेंडर, पंचांग न पाहणारे इच्छुक आता सण, वार, प्रभागात सुख दुख:च्या घटनांचा मागोवा सुगावा घेत फिरत आहेत. नेहमीच आपल्या तोऱ्यात राहणारे बहुसंख्य इच्छुक आता मतदारांसमोर नम्र होताना दिसत आहे. मतदारांना भुलविण्यासाठी नवीन वर्षानिमित्त मतदारांना भेटवस्तु देण्याचे प्रकार जोरात सुरू आहेत. नववर्षाच्या प्रारंभीच इच्छुकांनी दिनदर्शिकांचे मतदारांना वाटप करण्यात आले.तर काहींनी डायऱ्या, पिशवी आदि वस्तूंचे वाटप करण्यास प्रारंभ केला आहे.
महापालिकेच्या विविध प्रभागातील निम्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून हळदी- कुंकू लावण्याचा कार्यक्रम होत असून, मतदाराला भांडी, अन्य भेटवस्तूं दिल्या जात आहेत. त्याबरोबरच मतदारांसाठी भोजनावळी घातले जात आहेत. तसेच मतदारांना पर्यटनही घडविले जात आहे.