श्रींच्या स्थापनेसाठी भटजींची शोधाशोध

By Admin | Updated: September 5, 2016 02:35 IST2016-09-05T02:35:34+5:302016-09-05T02:35:34+5:30

लाडक्या गणरायाचे आगमन काही तासांवर येवून ठेपले आहे.

Bhatji's hunt for the establishment of Shri | श्रींच्या स्थापनेसाठी भटजींची शोधाशोध

श्रींच्या स्थापनेसाठी भटजींची शोधाशोध

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- लाडक्या गणरायाचे आगमन काही तासांवर येवून ठेपले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज झाले आहेत. घरोघरी श्रीमूर्तींच्या स्थापनेसाठी लगबग सुरू झाली आहे. जय्यत तयारी झाली असली तरी भटजींचे बुकिंग हाऊसफूल्ल झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात ३९७ सार्वजनिक व २८,५८१ घरगुती गणपती आहेत. स्थानिक आगरी-कोळ्यांचे गणपती हे आराध्य दैवत आहे. त्यामुळे प्रत्येक घरात भटजींच्या हस्ते विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना केली जाते. त्यामुळे गणेश चतुर्थीला भटजींना चांगलीच मागणी असते. मागणीपेक्षा शहरात भटजींची संख्या कमी असल्याने दरवर्षी गणेशभक्तांना भटजींसाठी शोधाशोध करावी लागते. गणेशभक्तांची ही गैरसोय दूर करण्यासाठी काही प्रस्थापित भटजी मंडळींनी पूजेसाठी बाहेरगावांतून भटजींची कुमक मागविली आहे. यावर्षी जवळपास एक हजार भटजी गणेशोत्सवासाठी शहरात दाखल झाले आहेत. यात नाशिक, सोलापूर, कोल्हापूर , सातारा, धुळे, जळगांव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील भटजींचा समावेश आहे.
नवी मुंबईत अनेक मंदिरे आहेत. गणेशपूजेसाठी मंदिरांतील भटजींकडे बुकिंग केले जाते. एका मंदिरात पूजेसाठी कमीत कमी २0 व जास्तीत जास्त ५00 जणांचे बुकिंग होते. श्रींच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंतच्या सर्व विधींचा यात समावेश असतो. पूजेची आॅर्डर पूर्ण करण्यासाठी बाहेर गावांतील भटजींचा आधार घेतला जातो. वाशी गाव येथील जागृतेश्वर मंदिरात यंदा गणरायाच्या स्थापनेसाठी रविवारी संध्याकाळपर्यंत तब्बल ७00 जणांनी भटजींची बुकिंग केली आहे. त्यासाठी अन्य जिल्ह्यांतून ३५ भटजींना बोलावले आहे. गणेशोत्सव होईपर्यंत त्यांचा निवास व जेवणाची सोय करण्यात आली आहे. शहरात अनेकदा भटजी नसला तरी पारंपरिक पध्दतीने श्रींच्या मूर्तीची स्थापना केली जाते, परंतु गावांत पूजेसाठी भटजी लागतोच. त्यासाठी अन्य जिल्ह्यातील भटजींना पाचारण करावे लागते. यावर्षी वाशी ते कोपरखैरणे या विभागात इतर जिल्ह्यांतून जवळपास अडीचशे भटजी गणेशोत्सवासाठी दाखल झाले आहेत. तर ऐरोली ते बेलापूर या पट्ट्यात बाहेरून आलेल्या या भटजींची संख्या एक हजाराच्या घरात आहे, अशी माहिती वाशी गाव येथील जागृतेश्वर मंदिरातील पुजारी नीलेश गुरूजी यांनी दिली.
दहा दिवसांत १५ हजारांची कमाई
पूजेच्या आॅर्डरनुसार भटजींना पाचारण केले जाते. त्यानुसार बाहेरगावातून आलेल्या एका भटजीला साधारण पंधरा गणपतींची आॅर्डर दिली जाते. एका पूजेसाठी ७५0 रूपयांची दक्षिणा मिळते. शिवाय सत्यनारायणाची पूजा असल्यास त्याची वेगळी दक्षिणा दिली जाते. अशाप्रकारे बाहेरगावातून आलेला एक भटजी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत १0 ते १५ हजार रूपयांची कमाई करतो.

Web Title: Bhatji's hunt for the establishment of Shri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.