साहित्य संमेलन भरवणं ही नस्ती उठाठेव - भालचंद्र नेमाडे
By Admin | Updated: November 28, 2014 15:20 IST2014-11-28T11:28:34+5:302014-11-28T15:20:43+5:30
साहित्य संमेलन भरवणं ही नस्ती उठाठेव असून संमेलनावर चर्चा करणं हा वेळेचा अपव्यय आहे, अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे

साहित्य संमेलन भरवणं ही नस्ती उठाठेव - भालचंद्र नेमाडे
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - साहित्य संमेलन भरवणं ही नस्ती उठाठेव असून संमेलनावर चर्चा करणं हा वेळेचा अपव्यय आहे, अशी टीका 'हिंदू' व 'कोसला'कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केली आहे. या संमेलातून निव्वळ चर्चा होते, मात्र त्याबाबत पुढे काहीच होत नाही असेही ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुले वाड्यातील कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी संमेलनाविरोधात नाराजीचा सूर आळवला.
८८वे अखिल भारतीय मराठी साहित्या संमेलन संत नामदेव यांच्या कर्मभूमीत पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवरच नेमाडेंनी केलेल्या टीकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शहाणपणाला मर्यादा असते पण मूर्खपणाची काही हद्द नसते असे सांगत संमेलन भरवणं हे रिकाम्या लोकांचे उद्योग आहेत, असेही नेमाडे म्हणाले. तसेच या संमेलनासाठी राजकारण्याकडून पैसा घेण्यात येतो असे सांगत उद्या शत्रूकडूनही पैसे आणतील अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळाच असाव्यात, इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्यात याव्यात असे सांगत मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजीचे शिक्षण देण्यात यावे, असेही नेमाडे म्हणाले.