‘जन-धन’च्या प्रचारासाठी भारतभ्रमंती
By Admin | Updated: May 15, 2015 23:35 IST2015-05-15T21:33:11+5:302015-05-15T23:35:57+5:30
नृसिंहवाडीच्या सोमण यांचा छंद : मोटारसायकलवरून प्रवास, २६ ला पंतप्रधानांना भेटणार

‘जन-धन’च्या प्रचारासाठी भारतभ्रमंती
गणपती कोळी -कुरुंदवाड -प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील नागेश सोमण (वय ४०) यांना दुचाकी भ्रमंतीचा छंद आहे. त्यांनी देश विदेशांत मोटारसायकलवरून भ्रमंती करीत विश्वविक्रम केला आहे. केंद्र शासनाच्या ‘जन-धन’ योजनेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी मोटारसायकलवरून ते देशभर फिरत आहेत. सध्या ते पंजाबमध्ये असून, २६ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तीर्थक्षेत्र असणाऱ्या नृसिंहवाडी येथे सोमन भोजनालयातून चरितार्थ चालविणाऱ्या नागेश यांना मोटारसायकल भ्रमंतीचा आगळावेगळा छंद आहे. देशभरातील संपूर्ण तीर्थक्षेत्र, चीन, तिबेट, नेपाळ, पाकिस्तान, आदी सीमाभाग दुचाकीवरून प्रवास केल्याने त्यांच्या या प्रवासाची नोंद ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. केंद्र शासनाने जन-धन योजना चालू केली आहे. शासनस्तवरावर त्याचा प्रचार व कार्यवाही होत असली, तरी देशातील प्रत्येक नागरिकांना जन-धन योजनेचा लाभ होणार असल्याने या योजनेत देशवासीयांनी सहभागी होण्यासाठी सोमन यांनी मोटारसायकलवरून प्रचार व प्रसार मोहीम हाती घेतली आहे. बजाज डिस्कव्हर १५० सीसी या दुचाकीवरून जन-धन योजनेचा फलक लावून नृसिंहवाडी येथून १ मेपासून संपूर्ण देशात भ्रमंती चालू केली आहे. एकूण ३५ दिवसांचा त्यांचा हा प्रवास आहे. त्यांच्यासोबत विशाल पाटील हा (कणेरी मठ, कोल्हापूर) येथील तरुण सहभागी झाला आहे. दररोज ४५० ते ५०० किलोमीटर प्रवास करीत प्रत्येक राज्यातील प्रमुख शहरात थांबून जन-धन योजनेचे महत्त्व पटवून देत आहेत. त्यांच्या या मोहिमेला प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. सावंतवाडी, पणजी, मडगाव, मंगलोर, तिरुअनंतपुरम, कन्याकुमारी, चेन्नई, हैद्राबाद, पुणे, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, हिस्सार (हरियाणा) करत ते सध्या पंजाबमध्ये पोहोचले आहेत. २६ मे रोजी दिल्ली येथे नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्यांच्या या उपक्रमाला दत्त देवस्थानचे अध्यक्ष शशिकांत पुजारी, बॅँक आॅफ इंडियाचे जिल्हा प्रबंधक एम. जी. कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. यापूर्वी त्यांनी वृक्ष संवर्धनाचा जागर करत २२ दिवसांत १५ हजार ८५० किलोमीटरचा प्रवास केल्याने त्यांची ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’, यामध्ये नोंद झाली आहे. आता ‘जन-धन’ योजनेच्या प्रसाराच्या माध्यमातून देशभ्रमंती करीत असल्याने त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.