भानामतीचा संशय जिवावर उठला
By Admin | Updated: October 7, 2014 05:33 IST2014-10-07T05:33:25+5:302014-10-07T05:33:25+5:30
गेल्या वर्षापासून करणी करीत असल्याच्या संशयावरून एका विवाहितेस बहीण-भावाने पेटवून दिल्याची घटना माजलगाव तालुक्यातील तालेखड येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली

भानामतीचा संशय जिवावर उठला
माजलगाव (बीड) : गेल्या वर्षापासून करणी करीत असल्याच्या संशयावरून एका विवाहितेस बहीण-भावाने पेटवून दिल्याची घटना माजलगाव तालुक्यातील तालेखड येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास घडली. बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना पीडित महिलेचा मृत्यू झाला.
नीता आकाश डोंगरे (१९) असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, तिला जुळी मुले आहेत़ दोन वर्षांपूर्वी नीताचा विवाह झाला होता़ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना नीताने तहसीलदार व पोलिसांना जबाब दिला़ त्यानुसार शेजाऱ्यांनी करणी करीत असल्याचा आरोप माझ्यावर केला होता. त्यानंतर प्रमोद गायकवाड, सुषमा गायकवाड, मधू, देविनंदा यांनी गेल्या महिन्यापासून करणी करीत असल्याच्या संशयावरून त्रास देण्यास सुरुवात केली.
भानामती, करणी करीत असल्यामुळे कपड्यांना छिद्र पडत असल्याचा दावा शेजाऱ्यांनी केला होता़ रविवारी नीता यांचे आई-वडील त्यांना तालखेड येथे भेटण्यास आले होते़ सायंकाळी सातच्या सुमारास नीताच्या आई-वडिलांना सोडण्यासाठी तिचे सासू-सासरे गेले असल्याने नीता घरात एकटीच होती.
या संधीचा फायदा घेत प्रमोद गायकवाड व मधू गायकवाड त्यांच्या घरात गेले व घरातील डब्यामधील रॉकेल अंगावर ओतून त्यांनी नीता यांस पेटवून दिले. नीता यांच्या जबानीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी तीन वाजता नीताचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्रमोद गायकवाड वगळता ४ महिलांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)