‘सुलतान’ची किस्ताक ही भार्इंदरची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 03:21 IST2016-07-23T03:21:08+5:302016-07-23T03:21:08+5:30
सलमान खान याने सिनेमात कुस्ती लढताना परिधान केलेली किस्ताक (लंगोटच्या बाहेरून घालण्यात येणारे अंतर्वस्त्र) भार्इंदरचे राज्यस्तरीय पहिलवान रूपचंद माने यांनी तयार केली

‘सुलतान’ची किस्ताक ही भार्इंदरची भेट
भार्इंदर : बॉक्स आॅफिसचा आखाडा गाजवणारा ‘सुलतान’ अर्थात सलमान खान याने सिनेमात कुस्ती लढताना परिधान केलेली किस्ताक (लंगोटच्या बाहेरून घालण्यात येणारे अंतर्वस्त्र) भार्इंदरचे राज्यस्तरीय पहिलवान रूपचंद माने यांनी तयार केली आहे. शहरातील कुस्तीगिराला प्रथमच सुपरस्टार सलमानची किस्ताक शिवण्याची संधी मिळाल्याने सध्या माने कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
‘सुलतान’ चित्रपटाची कथा कुस्तीगिराच्या जीवनावरील असल्याने सलमानला कुस्तीची दृश्ये चित्रित करताना कुस्तीगीर वापरतात तशी किस्ताक वापरण्याची गरज निर्माण झाली. त्यावेळी सलमानचे कुस्ती प्रशिक्षक, एकेकाळचे देशातील नंबर एकचे पहिलवान भारत केसरी, दिल्लीचे जगदीश कालिरमन यांनी लंगोट शिवणाऱ्यांची शोधाशोध सुरू केली. त्यांनी संपर्कातील काही पहिलवानांकडे चौकशी सुरू केली असता भार्इंदरचे राज्यस्तरीय पहिलवान रूपचंद माने यांचे नाव पुढे आले. जगदीश यांनी भार्इंदर पूर्वेतील नवघर परिसरातील ‘साईलीला’ इमारतीत राहणाऱ्या रूपचंद यांच्याशी संपर्क साधला व त्यांना गोरेगाव चित्रनगरीत आमंत्रित केले. सध्या खाजगी वाहनचालकाची नोकरी करणारे माने यांनी २८ फेब्रुवारीला चित्रनगरी गाठली. तेथे त्यांनी सोबत नेलेल्या लंगोटांचे विविध प्रकार सलमानला दाखवले. परंतु, लंगोटाऐवजी अशी एखादी विजार असावी की, तिला नाडी नसेल, परंतु ती कुस्तीसाठी सुलभतेने वापरता येईल, अशी मागणी सलमानने माने यांच्याकडे केली. त्यावर क्षणभर विचार करीत माने यांनी लंगोटाऐवजी कुस्तीसाठी खास तयार करण्यात येणारी किस्ताक वापरण्याचा प्रस्ताव सलमानपुढे ठेवला.
सलमाननेही त्याला मान्यता दिली. प्रत्येकी एक हजार रु. या दराने किस्ताक शिवून देण्याचे ठरले. १० दिवसांनंतर माने यांनी किस्ताकचा नमुना तयार करून तो सलमानला दाखवला. ती किस्ताक सलमानला आवडल्याने त्याने एकदम १५ किस्ताक तयार करण्याची आॅर्डर माने यांना दिली. १५ पैकी एका किस्ताकमध्ये काही त्रुटी असल्याने सलमानने १४ किस्ताक १४ हजारांत विकत घेतल्या. माने यांच्या किस्ताक सलमानने चित्रपटात वापरल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी राष्ट्रीयस्तरावरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेत माने यांची दोन मुले वैभव व अक्षय यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांच्याजवळ किस्ताक नसल्याने त्यांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यास निवड समितीने नकार दिला होता. किस्ताकसाठी माने यांनी बरीच शोधाशोध केली. परंतु, त्यांना लागलीच ती मिळाली नाही. यामुळे मुलांचा कुस्ती स्पर्धेतील सहभाग हुकणार, अशी भीती वाटल्याने माने यांनी स्वत:च किस्ताक तयार करण्याचा निर्धार केला.
सातारा जिल्ह्यातील वेळकामठी गावातील या खानदानी कुस्तीगिराने बाजारातून कापड आणले आणि शिवणकामाचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना मुलांसाठी किस्ताक तयार केल्या. त्या इतक्या लोकप्रिय झाल्या की, त्यांना देशातील अनेक भागांतून मागणी येऊ लागल्याचे माने सांगतात. (प्रतिनिधी)