युतीच्या सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:22+5:302015-02-10T00:56:22+5:30

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देणाऱ्या युती सरकारने सत्तेत आल्यानंतर जनविरोधी धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना

The betrayal of the farmers by the coalition government | युतीच्या सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

युतीच्या सरकारने केला शेतकऱ्यांचा विश्वासघात

काँग्रेस उतरली रस्त्यावर : धोरणांविरोधात घोषणाबाजी
नागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देणाऱ्या युती सरकारने सत्तेत आल्यानंतर जनविरोधी धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी आश्वासनांवर झुलवत ठेवले आहे, असा आरोप करीत काँग्रेस कमिटीने व्हेरायटी चौकात रास्तारोको केला. माजी मंत्री नितीन राऊ त, शहर काँगे्रसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सरकार विरोधात घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होते. काही वेळ चौकातील वाहतूक रोखल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. आंदोलनात यात अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, प्रफुल्ल गुडधे, उमाकांत अग्निहोत्री, दीपक कापसे, प्रशांत धवड, डॉ. गजराज हटवार, राजू व्यास, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके, जयंत लुटे, तानाजी वनवे, संजय दुधे, संजय दुबे, नगरसेविका निमिषा शिर्के, मालूताई वनवे, प्रेरणा कापसे, शीला मोहड, सिंधू उईके, पुष्पा निमजे, रेखा बाराहाते, सुरेश पिल्लेवार यांच्यासह शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने त्यांना अद्याप आर्थिक मदत दिलेली नाही. शेतकरी पॅकेजच्या नावाखाली तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. तसेच दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांना यातून वगळण्यात आले. निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळण्यास युती सरकारने नकार देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचे विकास ठाकरे म्हणाले.
भूमी अधिग्रहण कायद्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. उद्योगपती व बिल्डर यांनाच या धोरणाचा लाभ होणार आहे. दुसरीकडे उद्योगपतींच्या भल्यासाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना माफक दरात होणारा धान्यपुरवठा बंद केला आहे. सवलतीत कपात करण्यात आल्याने सात हजार लघु उद्योजकांपुढे गंभीर संकट उभे ठाकल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
अटक व सुटका
शेकडो आंदोलकांनी स्वत:ला अटक करून घेतली. सर्वांना पोलीस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.

Web Title: The betrayal of the farmers by the coalition government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.