बेस्ट भाडेवाढ लागू ; खिशाला चाट
By Admin | Updated: February 2, 2015 04:56 IST2015-02-02T04:56:41+5:302015-02-02T04:56:41+5:30
बेस्टचे किमान बसभाडे रविवारपासून ६ रुपयांवरून ७ रुपये झाले आणि पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी ‘नॉट बेस्ट’ म्हणत बेस्टच्या

बेस्ट भाडेवाढ लागू ; खिशाला चाट
मुंबई : बेस्टचे किमान बसभाडे रविवारपासून ६ रुपयांवरून ७ रुपये झाले आणि पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी ‘नॉट बेस्ट’ म्हणत बेस्टच्या नावाने बोटे मोडली. महागाईच्या जमान्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना हा प्रवास ‘बेस्ट’ वाटत असतानाच झालेल्या भाडेवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी झळ बसली.
बेस्टचे फेब्रुवारीपासून किमान बसभाडे ६ रुपयांवरून ७ रुपये तर वातानुकूलित बसभाडे २०वरून २५ रुपये झाले. तर १ एप्रिलपासून किमान भाडे ७वरून ८ रुपये तर वातानुकूलित बसभाडे २५वरून ३० रुपये होणार आहे. मात्र रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीला वैतागलेल्या मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला आता बेस्ट भाडेवाढीनेही कात्री लावली आहे. रविवारपासून लागू झालेली भाडेवाढ प्रवाशांच्या लक्षात राहिली नाही. परिणामी, प्रवासादरम्यान वाहकाने झालेली भाडेवाढ लक्षात आणून दिल्यानंतर प्रवाशांच्या कपाळाला आठ्या पडल्याचे चित्र होते.
महत्त्वाचे म्हणजे रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने मुंंबईकर बेस्टने प्रवास करणे पसंत करतात. परंतु, भाडेवाढीचा पहिलाच दिवस प्रवाशांना तापदायक ठरला. तिकीट भाडेवाढ झाल्याने
रेल्वे स्थानकापासून जवळ असणाऱ्या ठिकाणांहून प्रवाशांनी मग
शेअर रिक्षानेच प्रवास करणे पसंद केले. तर लांबच्या प्रवासासाठी प्रवाशांना बेस्टचा आधार घ्यावा लागला. (प्रतिनिधी)