पोलिसांच्या ‘यंग ब्रिगेड’मुळे झाला नक्षलींचा बीमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:43 IST2018-04-27T01:43:05+5:302018-04-27T01:43:05+5:30
महिलांच्याही हाती एके-४७ : धडक अंमलबजावणीचे यश

पोलिसांच्या ‘यंग ब्रिगेड’मुळे झाला नक्षलींचा बीमोड
राजेश निस्ताने ।
मुंबई : नक्षलग्रस्त गडचिरोलीत कार्यरत असलेल्या पोलीस दलातील उच्चशिक्षित अधिकाऱ्यांच्या ‘यंग ब्रिगेड’मुळे नक्षलवाद्यांचा खात्मा होत असून या भागातील नक्षली चळवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. महिला पोलीस अधिकारीसुद्धा एके-४७ हाती घेऊन जंगलात नक्षल्यांचा खात्मा करीत आहेत.
आजवर गडचिरोलीतील नियुक्ती ही काळ्यापाण्याची शिक्षा समजली जायची. परंतु सरकारने गडचिरोलीत तीन वर्षे सेवा दिलेल्यांना पसंतीच्या ठिकाणी नियुक्ती देण्याचे धोरण आखल्याने येथे नियुक्ती मिळालेले अधिकारी आनंदाने कार्यकाळ पूर्ण करत आहेत. तर २५ टक्के अधिकारी ‘मिशन’ म्हणून स्वत:हून गडचिरोलीत येण्यास उत्सुक असतात. गेल्या पाच वर्षांत शंभरपेक्षा अधिक नक्षलवादी मारले गेले तर ६५० पेक्षा अधिक शरण आले आहेत.
आजाराने ग्रासले
१नुकत्याच राबविलेल्या दोन मोहिमांमध्ये तब्बल ३७ नक्षलवादी मारले गेले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. नक्षल चळवळीतील ‘बॉस’चे वय ६० वर्षांपेक्षा अधिक असून त्याला विविध आजारांनी ग्रासले आहे. नक्षलींच्या १४ सदस्यीय कोअर कमिटीमध्ये केवळ दोनच सदस्य तरुण आहेत. तर पोलीस अधिकाºयांचे वय सरासरी २५ वर्षे आहे. त्यामुळे विचार क्षमता, गतिमानता यात पोलीस सरस ठरत आहेत.
२गत आठवड्यातील मोहिमेत नक्षल्यांचे चार प्रमुख नेते मारले गेले. या चकमकीत नक्षलींची दोन दलम व एक प्लाटून पूर्णता संपली. नेतृत्वाची फळीच गारद झाल्याने नक्षलवादी हादरले आहेत.
इंजिनीअर, डॉक्टर, सीए खाकी वर्दीत
गडचिरोली जिल्ह्यात ३५० पैकी शंभरावर पोलीस निरीक्षक हे अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे पदवीधर आहेत. तर पाच आयपीएस अधिकाºयांपैकी तीन डॉक्टर, एक चार्टर्ड अकाउंटंट व एक एमबीए आहे. शिवाय, नऊ पोलीस उपअधीक्षकांपैकी पाच डॉक्टर आहेत. इंटेलिजन्सचे लोकल नेटवर्क आणि ५८ चौक्यांवरील बीडीडीएसची सक्रियता पोलिसांना अधिक फायदेशीर ठरत आहे.
नक्षलविरोधी मोहिमेत तरुण आणि उच्चशिक्षित अधिकारी आहेत. शिवाय, जवानांची शारीरिक तंदुरुस्ती, जोश, मानसिक स्थिती, टायमिंग, अत्युच्च दर्जाचे प्रशिक्षण, अत्याधुनिक शस्त्रे-दारूगोळा, वाहतूक व्यवस्था, कम्युनिकेशन्स, इंटेलिजन्स, नियोजन, सरकार आणि पोलीस मुख्यालयातून मिळणारे पाठबळ आदीमुळे पोलिसांच्या मोहिमा यशस्वी होत आहेत.
- बिपीन बिहारी, पोलीस महासंचालक
(कायदा व सुव्यवस्था), मुंबई