झेंडेंनी बनविले बोगस शिक्के!
By Admin | Updated: April 6, 2015 23:20 IST2015-04-06T23:20:38+5:302015-04-06T23:20:38+5:30
ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना संभाजी झेंडे यांनी बोगस रबरस्टॅम्प बनवून एका रात्रीत ८ हजार कागदपत्रे बदलून टाकली.

झेंडेंनी बनविले बोगस शिक्के!
मुंबई : ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना संभाजी झेंडे यांनी बोगस रबरस्टॅम्प बनवून एका रात्रीत ८ हजार कागदपत्रे बदलून टाकली. आता ते एसआरए व म्हाडामध्ये जाऊन बसले आहेत, असा सनसनाटी आरोप करीत आ. नरेंद्र मेहता यांनी आज विधानसभेत मीरा भार्इंदर हद्दीतील ३६८८ सॉल्ट मार्श लॅन्ड जमिनीचा विषय लक्षवेधीद्वारे मांडला.
मीरा-भार्इंदर येथील जमिनीचा विषय चांगलाच गाजला. नरेंद्र मेहता यांच्या लक्षवेधीवर अनेक सदस्यांनी मुद्दे उपस्थित केले. या भागात ही कंपनी कोणतेही बांधकाम करताना बिल्डरांकडून मोठ्या प्रमाणात कमिशन घेते, कंपनीचे काम संशयास्पद आहे. यात अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत. न्यायालयाच्या निकालाचे चुकीचे अर्थ लावले गेले आहेत. हे काम करणाऱ्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असे सवाल या लक्षवेधीत सदस्यांनी उपस्थित केले.
वहिवाटधारकांना विश्वासात न घेता, कोणतीही चौकशी न करता त्यांच्या इस्टेटीवर शिक्के मारले गेले, असा आक्षेप आ. अॅड. आशिष शेलार यांनी घेतला. तर या भागात दि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीची एनओसी मिळत नाही; तोपर्यंत महापालिकेची परवानगी मिळत नाही, असे सांगत
या कंपनीचे भागीदार शाहीद
बलवा आहेत का, असा प्रश्न
आ. प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला.
लक्षवेधील उत्तर देताना महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, या कंपनीकडे ८९९४ एकर जमीन आहे. ती १९४५ साली त्यांनी ब्रिटीश कंपनीकडून विकत घेतली होती. आता त्या कंपनीचे कोण भागीदार आहेत याची माहिती अधिवेशन संपण्याच्या आत सभागृहात ठेवली जाईल. तसेच या सगळ्या प्रकरणाची व तक्रारींची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल. तीन महिन्याच्या आत ती पूर्ण केली जाईल व त्याचा अहवाल सभागृहात ठेवला जाईल.
(विशेष प्रतिनिधी)