बेळगाव महापालिकेत सीमाप्रश्नाचा ठराव नाही
By Admin | Updated: November 18, 2014 02:24 IST2014-11-18T02:24:21+5:302014-11-18T02:24:21+5:30
मराठी भाषिकांची सत्ता असतानाही महानगरपालिका बैठकीत मराठी भाषिक नगरसेवकांनी सीमाप्रश्नाचा ठराव तर मांडला नाही

बेळगाव महापालिकेत सीमाप्रश्नाचा ठराव नाही
बेळगाव : मराठी भाषिकांची सत्ता असतानाही महानगरपालिका बैठकीत मराठी भाषिक नगरसेवकांनी सीमाप्रश्नाचा ठराव तर मांडला नाही. शिवाय बेळगावच्या नामांतराबाबत एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे बैठकीत पुन्हा मराठी नगरसेवकांचे बेगडी प्रेम समोर आले आहे.
बेळगाव महापालिकेच्या पहिल्या बैठकीत सीमाप्रश्नाचा ठराव न मांडल्याने आणि कर्नाटक सरकार कारवाई करील या भीतीने १ नोव्हेंबर या काळ्यादिनाच्या सायकलफेरीत मराठी नगरसेवक सामील झाले नव्हते. यामुळे महापौर महेश नाईक, उपमहापौर रेणू मुतगेकर यांच्या विरोधात मराठी जनतेने रोष व्यक्त केला होता. महापौरांच्या घरावर मोर्चा काढला होता. काही नगरसेवकांना बैठकीत बोलावून ठराव न मांडल्याबद्दल जाबही विचारला होता, पण मराठी भाषिक नगरसेवक सभागृहात गप्प राहिले. मात्र, बेळगाव शहराचे नामांतर बेळगावी असे केल्याने या नामांतराला मराठी नगरसेवकांकडून महापालिकेत विरोध अपेक्षित होता, मात्र सर्वसाधारण बैठकीत बेळगावी नामांतराविरोधात ‘ब्र’सुद्धा न काढल्याने मराठी भाषिकांत संताप व्यक्त होत आहे.
मराठीत बेळगाव, कन्नडमध्ये बेळगावी आणि इंग्रजीमध्ये बेलगाम असेच आहे. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केल्याचे महापौर महेश नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)