बैलगाडामालकांच्या नजरा अधिवेशनाकडे
By Admin | Updated: March 6, 2017 01:27 IST2017-03-06T01:27:24+5:302017-03-06T01:27:24+5:30
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी कायदा होण्याची शक्यता असल्याने बैलगाडा मालकांच्या नजरा अधिवेशनाकडे लागल्या आहेत

बैलगाडामालकांच्या नजरा अधिवेशनाकडे
मंचर : उद्यापासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी कायदा होण्याची शक्यता असल्याने बैलगाडा मालकांच्या नजरा अधिवेशनाकडे लागल्या आहेत. कायदा मंजूर झाल्यानंतर बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा होऊन पुन्हा एकदा ग्रामीण भागात गावोगावी भिर्रर्रर्र...चा आवाज घुमणार आहे.
ग्रामीण भागाची परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यती ७ मे २०१७ पासून बंद आहे. ग्रामीण भागाच्या अर्थकारणावर त्यामुळे परिणाम झाला आहे. शर्यती सुरू होण्यासाठी बैलगाडामालक आग्रही आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली आहे. तत्कालीन केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अधिसूचना काढून बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली होती. मात्र, प्राणिमित्रांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती आणल्याने थोड्या दिवस सुरू झालेल्या बैलगाडाशर्यती पुन्हा बंद झाल्या.
तमिळनाडू राज्यात जलीकट्टूसाठी नागरिकांनी आंदोलन केले. त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. तमिळनाडू सरकारने सुरुवातीस अधिसूचना काढून व नंतर विधेयक मंजूर करून जलिकट्टूला परवानगी दिली. कर्नाटक राज्यानेसुद्धा त्याच धर्तीवर परवानगी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने तमिळनाडू राज्याप्रमाणे पावले उचलावीत, असा बैलगाडामालक व शौकिनांचा आग्रह होता.
विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. कधी नव्हे ते गावागावांत अधिवेशनासंदर्भात चर्चा होत आहेत.