दारूबंदी चळवळीचा यवतमाळमध्ये बळी !
By Admin | Updated: July 4, 2015 03:53 IST2015-07-04T03:53:26+5:302015-07-04T03:53:26+5:30
यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीसाठी आंदोलन पेटलेले असतानाच दारूबंदीसाठीच्या बैठकीस गेलेल्या पोलीस पाटलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला़ ही घटना

दारूबंदी चळवळीचा यवतमाळमध्ये बळी !
अकोलाबाजार (जि़ यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीसाठी आंदोलन पेटलेले असतानाच दारूबंदीसाठीच्या बैठकीस गेलेल्या पोलीस पाटलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला़ ही घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर यावली येथे झाली़ दारूबंदी चळवळीवर रक्त सांडल्याच्या या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी उमटले़ गावकऱ्यांनी मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालय व पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक दिली़ पालकमंत्री संजय राठोड यांनी आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला़ वीरेंद्र नामदेव राठोड (५५) असे पोलीस पाटलाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे़
पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांच्याकडे यावलीसह कोळंबी गावाचाही अतिरिक्त प्रभार होता. यावलीत दारूबंदीसाठी जोर धरला आहे. गुरुवारी मध्यरात्री यावलीतील कोलाम पोडावर दारूबंदीसाठी बैठक होती. त्यातच तेथे काही लोकांमध्ये वाद झाला. तो मिटविण्यासाठी महिलांनी त्यांना बोलावले होते. शिवाय घटनेची माहिती वडगाव (जंगल) पोलिसांनाही देण्यात आली. मात्र, पोलीस तेथे पोहोचलेच नाही. अखेर वीरेंद्र यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला़ मध्यरात्रीनंतर दुचाकीने ते घराकडे परतत असताना रस्ता अडवून दगडाने ठेचून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. या घटनेचे जिल्ह्णात शुक्रवारी तीव्र पडसाद उमटले़ गावकऱ्यांनी दुपारी २ वाजता वीरेंद्र यांचा मृतदेह घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी गावकऱ्यांची समजूत घातली. त्यानंतर गावकरी मृतदेहासह पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयावर धडकले. पोलीस पाटील वीरेंद्र हे दारुबंदी चळवळीचे बळी ठरले असून, आता तरी जिल्ह्णात दारूबंदी करा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली़ त्यावर पोलीस अधीक्षकांशी दारूबंदी व अवैध धंद्यांच्या पूर्णत: बंदीसाठी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन राठोड यांनी दिले. त्यानंतर जमाव मृतदेहासह गावाकडे रवाना झाला. (वार्ताहर)
दारूविक्रीला विरोध केल्याने पोलीस पाटलाची हत्या झाल्याचे प्रकरण धक्कादायक आहे. आंदोलनकर्त्यांना यापुढे यंत्रणेकडून पूर्ण सहकार्य देण्यात येईल. तसे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
- सचिंद्र प्रताप सिंह,
जिल्हाधिकारी, यवतमाळ.
पोलीस पाटील हत्या प्रकरणात पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. या मागे कोण आहे याचा शोध घेतला जात आहे. गावात आरोपी दारू पिऊन आले होते. यातून ही घटना घडली. हत्येमागे या व्यतिरिक्त आणखी दुसरे कोणते कारण आहे काय, याचाही तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.
- अखिलेश कुमार सिंह,
पोलीस अधीक्षक, यवतमाळ.
जिल्ह्णात दारूबंदी आंदोलन सुरू आहे. यामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत़ लोकप्रतिनिधी वरकरणी आंदोलनाला पाठिंबा दर्शवित असले तरी प्रत्यक्षात तसे घडत नाही. हे आंदोलन दडपण्यासाठी अशा घटना घडत आहे.
- संगीता पवार, दारूबंदी आंदोलक
या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाईचे निर्देश आपण दिले आहेत. त्यात पोलिसांचा दोष असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पायबंद घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीसाठी ठोस पावले उचलली जातील.
- संजय राठोड,
पालकमंत्री, यवतमाळ.