कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन मागे
By Admin | Updated: March 14, 2015 05:45 IST2015-03-14T05:45:37+5:302015-03-14T05:45:37+5:30
कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शिक्षणमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन मागे
मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शिक्षणमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शुक्रवारी बारावी पेपर तपासणीवरील असहकार आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीची एकच मागणी मान्य झाल्याने समितीने दहावी पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची संच मान्यता व नियुक्ती तातडीने करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना विनाअट निवड श्रेणी द्यावी, अशा मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक महासंघाने बारावी पेपर तपासण्याचे असहकार आंदोलन सुरू केले होते. शुक्रवारी शिक्षणमंत्र्यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्याने महासंघाने आपले असहकार आंदोलन मागे घेतले असल्याचे, महासंघाचे सरचिटणीस प्रा. अनिल देशमुख यांनी
सांगितले.
तर शिक्षणमंत्र्यांनी शाळांची फेरतपासणी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, शाळांच्या अनुदानासाठी निधीची तरतूद झाली नसल्याने महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने दहावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे, समितीचे मुंबई विभागीय अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
आंदोलनाबाबत समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आम्ही भूमिका जाहीर करू, असेही रेडीज यांनी सांगितले.