चक्का जाम मागे
By Admin | Updated: July 16, 2014 03:19 IST2014-07-16T03:19:08+5:302014-07-16T03:19:08+5:30
जकात कर रद्द केल्यानंतर त्यासोबत वसूल करण्यात येणारी एस्कॉर्ट फी रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत चक्का जाम

चक्का जाम मागे
मुंबई : जकात कर रद्द केल्यानंतर त्यासोबत वसूल करण्यात येणारी एस्कॉर्ट फी रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत चक्का जाम करण्याचे आंदोलन मालवाहतुकदारांनी अखेर मागे घेतले. आंदोलन केल्यास चर्चा करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतर आणि परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी शुल्काबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर मालवाहतुकदार संघटनेने चक्काजाम आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनामुळे राज्यातील तसेच परराज्यातून होणाऱ्या मालवाहतुकीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य शासनाने माल वाहतूकदारांवर मेस्मा लागू करण्याचा इशारा दिला होता.
राज्यातील जकात बंद करताना त्यासोबत वसूल करण्यात येणारे एस्कॉर्ट शुल्कही रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर २०१३मध्ये दिले होते. तसे इतिवृत्तही संघटनेजवळ आहे. मात्र आजही सर्व जकात नाक्यांवर सरकारी अधिकारी जबरदस्तीने एस्कॉर्ट शुल्क वसूल करीत आहेत. त्याच्या निषेधार्थ रात्रीपासून बेमुदत ‘चक्का जाम’ करण्यात येणार असल्याचे मालवाहतूकदारांनी सांगितले होते. मात्र रात्री उशिरा परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी एस्कॉर्ट शुल्काबाबत महिनाभरात तोडगा काढण्याबाबत आश्वासन दिले असून मुख्यमंत्र्यांनीही बुधवारी चर्चेसाठी बोलविले आहे. त्यामुळे हे आंदोलन एक महिन्यासाठी स्थगित करण्यात येत असल्याचे बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सरचिटणीस अशोक राजगुरू यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)