उपोषण मागे, मात्र आंदोलन सुरूच ठेवणार
By Admin | Updated: July 30, 2014 02:28 IST2014-07-30T02:28:58+5:302014-07-30T02:28:58+5:30
कृती समितीच्या नेत्यांनी मागणी मान्य होईर्पयत हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा निर्णय जाहीर केला.

उपोषण मागे, मात्र आंदोलन सुरूच ठेवणार
धनगर समाज आरक्षण कृती समितीचा निर्णय
बारामती : उपोषण व आंदोलनानंतरही धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन राज्य शासनाकडून मिळाले नाही. त्यामुळे कृती समितीच्या नेत्यांनी मागणी मान्य होईर्पयत हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा निर्णय जाहीर केला.
या मागणीसाठी गेले 9 दिवस सुरू असलेले उपोषण आंदोलन महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले. बारामती येथे 16 जणांनी आमरण उपोषण सुरू केले. 25 जुलैला कृती समितीच्या नेत्यांबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी चर्चा केली, मात्र चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे तरुण कार्यकत्र्याचा संयम सुटला. दगडफेक, जाळपोळ, रास्ता रोको अशी आंदोलने राज्यभर सुरू झाली होती. महायुतीचे नेते महादेव जानकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार राम शिंदे, विजय शिवतारे, आरक्षणाची चळवळ उभी करणारे कै. डॉ. भीमराव शेंबडे यांच्या कन्या डॉ. उज्ज्वला हाके, यशवंत सेनेचे संस्थापक कै. बी. के. कोकरे यांचे वडील खंडेराव कोकरे यांच्या उपस्थितीत आंदोलकांनी उपोषण सोडले.
कृती समितीचे नेते बाळासाहेब गावडे, हनुमंत सुळ यांनी सांगितले, की उपोषण आंदोलन मागे घेतले असले तरी मंगळवारपासूनच चक्री उपोषण सुरू करण्यात आले असून, जिल्ह्याजिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतींनी आंदोलन केले जाईल.