अधिवेशनाची वादळी सुरुवात!
By Admin | Updated: March 10, 2015 04:31 IST2015-03-10T04:31:57+5:302015-03-10T04:31:57+5:30
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून वादळी प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या

अधिवेशनाची वादळी सुरुवात!
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून वादळी प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत नाकारणाऱ्या फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा देत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या गाडीला घेराव घातला.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने सोमवारी अधिवेशनाला सुरुवात झाली. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल विधान भवन परिसरात दाखल होताच विरोधीपक्षाच्या आमदारांनी त्यांना सरकारच्या निषेधाचे फलक दाखविले. अभिभाषण सुरू असताना, ‘कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येचा धिक्कार असो’, ‘नुकसानभरपाई न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, मराठा, मुस्लीम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,’ अशा घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उभे राहून मागे गोंधळ घालणाऱ्या आमदारांची नावे लिहून घेत असल्याचे हावभाव करू लागले तेव्हा विरोधकांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)