चुरशीच्या वांद्रे पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
By Admin | Updated: April 11, 2015 11:39 IST2015-04-11T04:08:09+5:302015-04-11T11:39:42+5:30
शिवसेना, काँग्रेस व एमआयएम अशी तिरंगी लढत असलेल्या वांद्रे पोटनमिडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.

चुरशीच्या वांद्रे पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) आणि सांगलीच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली असून संपूर्ण राज्याचे लक्ष वांद्रे पोटनिवडणुकीकडे लागले आहे. वांद्र्यात १०, तर तासगावमध्ये ९ उमेदवार रिंगणात आहेत.
शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे (पू.) मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेने तिकीट दिले असून, त्यांच्यात आणि काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामध्ये खरी चुरस आहे. तृप्ती सावंत व शिवसेनेला आव्हान देत नारायण राणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून राणे यांचे राजकीय भवितव्य आजच्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. एमआयएमने उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसची मते विभागली जाणार असून त्याचा फायदा शिवसेनेला मिळेल असा कयास आहे. याचाच आधार घेत राणे यांनी एमआयएम ही शिवसेना भाजपाची टीम बी असल्याची टीका केली होती.
माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे तासगाव-कवठेमहांकाळची पोटनिवडणूक होत
आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस वगळता अन्य कुठल्याही राजकीय पक्षाने उमेदवार दिलेले नाहीत, तरीही आर. आर. पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्यापुढे ८ अपक्षांचे आव्हान आहे. त्यात भाजपाचे बंडखोर उमेदवार स्वप्निल पाटील यांचा समावेश आहे.