भीमगोंडा देसाई कोल्हापूर : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेनुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी एप्रिल ते जून २०२४ अखेरपर्यंतची साडेसात अश्व शक्तीपर्यंतच्या सर्व कृषी पंपधारकांना वीज बिले शासनाने शून्य करून दिली, परंतु आता डिसेंबरपासून पूर्ववत पोकळ थकबाकीसह बिले दिली आहेत. अनेकांची वीज बिले ५० हजारांच्यावर असल्याने कृषी पंपधारकांची झोप उडाली आहे.गेल्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साडेसात अश्वशक्तीपर्यंतचे थकीत आणि चालू वीज बिल माफ, अशी घोषणा केली. तोंडावर विधानसभा निवडणूक असल्यामुळे याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यानंतरचे तीन महिन्यांचे कृषी पंपाचे वीज बिल शून्य म्हणून दिले आहे. कृषी पंपधारक बिलावर थकीत रक्कम नाही, चालू बिलही शून्य आहे, हे पाहून सुखावला आहे.निवडणुकीत मतदान करून पुन्हा महायुतीसरकारला निवडून दिले. महायुतीचेसरकार पुन्हा सत्तेवर आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झाले आहेत. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री त्यावेळचेच आहेत. तरीही, कृषी पंपधारकांना वीज बिल थकबाकीसह दिले आहे. चालू देयक शून्य, असे म्हटले आहे. यामुळे कृषी पंपधारकांची फसवणूक झाल्याची भावना तयार झाली आहे.
बिल आले, फोटो गायबमागील कोणत्याही थकीबाकीचा उल्लेख नाही, अशा शून्य वीज बिल आलेल्या बिलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यावेळचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे ठळक फोटा होते. साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज, १४ हजार ७६१ कोटींची तरतूद, असा आशय होता. आताचे बिल थकीबाकीसह आले आहे. त्या बिलावरून मागील बिलावरील फोटो मात्र गायब आहेत.
चालू बिलातून ग्राहकांची दिशाभूलचालू कृषी बिलात बिल कधीचे आहे, याची तारीख नाही. बिलावर फक्त डिसेंबर २०२४ असा उल्लेख आहे. बिलाच्या दर्शनी पानावर चालू बिल आहे की थकबाकी आहे, याचाही स्पष्ट उल्लेख नाही. १७ फेब्रुवारीअखेर देय बिल भरावे, असे त्यात स्पष्टपणे म्हटले आहे. मागील पानावर चालू वीज देयक शून्य म्हटले आहे. पण, चालू म्हणजे कधीचे, किती महिन्यांचे किती दिवसांचे याचाही उल्लेख नाही.
शासनाने थकबाकीसह बिले पाठवून शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे. ते असेच करणार याची खात्री होती. वीज कंपनीला आजारी पडून ती अदानीच्या घशात घालण्याचा डाव आहे. - राजू शेट्टी, शेतकऱ्यांचे नेते