Dhananjay Deshmukh To Meet Manoj Jarange Patil: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली होती. मनोज जरांगे पाटील यांनीही सातत्याने ही मागणी लावून धरली होती. आता मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकडे वळवला असून, आमरण उपोषण सुरू केले आहे.
मनोज जरांगे यांच्यासोबत अनेकांनी त्यांच्या आमरण उपोषणात सहभाग घेतला आहे. मनोज जरांगे यांच्यासह अनेकांची प्रकृती तिसऱ्या दिवशी खालावली आहे. बीड प्रकरणात सक्रीय असलेल्या मनोज जरांगे यांना साथ देण्यासाठी मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख अंतरवाली सराटी येथे गेले आहेत. तिथे मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणात सहभागी होत आहेत. मात्र, तत्पूर्वी धनंजय देशमुख यांनी सरकारला अल्टिमेटम दिले आहे.
मनोज जरांगेंची प्रकृती खूप खालावत आहे, त्यांना बळ द्या
मनोज जरांगेंची प्रकृती खूप खालावत आहे. त्यांना बळ द्या. सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी विनंती करतो. सरकारने गांभीर्यपूर्वक याची दखल घेतली पाहिजे. उद्याच्या उद्या शिष्टमंडळाने येऊन या ठिकाणी भेट दिली पाहिजे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यामुळे सरकारने त्या मान्य कराव्यात, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, धनंजय देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात सहभागी होणार आहेत. ते मनोज जरांगेंसोबत उपोषणासाठी बसणार आहेत. धनंजय देशमुखांसोबत मस्साजोगचे ग्रामस्थही आंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. धनंजय देशमुख दाखल होताच मनोज जरांगे पाटील हे उठून बसले. मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बोलता येत नाही.