बोलत नाही म्हणून प्रेयसीने प्रियकराच्या अंगावर फेकले अॅसिड
By Admin | Updated: June 10, 2017 09:03 IST2017-06-10T09:01:19+5:302017-06-10T09:03:25+5:30
प्रेमाला, लग्नाला नकार दिला म्हणून तरुणाने तरुणीच्या चेह-यावर अॅसिड फेकल्याच्या अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकल्या असतील.

बोलत नाही म्हणून प्रेयसीने प्रियकराच्या अंगावर फेकले अॅसिड
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - प्रेमाला, लग्नाला नकार दिला म्हणून तरुणाने तरुणीच्या चेह-यावर अॅसिड फेकल्याच्या अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकल्या असतील. पण शुक्रवारी संध्याकाळी मुंबईच्या गोरेगावमध्ये याउलट घटना घडली. प्रियकर बोलायचा बंद झाला म्हणून संतापलेल्या प्रेयसीने प्रियकरावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात प्रियकर ओमसिंग सोलंकी गंभीर जखमी झाला असून त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे.
गोरेगावच्या एमजी रोडवर असलेल्या एका दुकानात ओमसिंग नोकरीला आहे. याच दुकानात काम करणा-या एका तरुणीसोबत त्याचे सूर जुळले होते. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. प्रेमाचे गोड गुलाबी दिवस सरल्यानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. अशाच एका वादातून ओमसिंगने प्रेयसीशी बोलणे बंद केले होते. तरुणीने ओमसिंगची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
शुक्रवारी संध्याकाळी दुकानात असताना तरुणीने पुन्हा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दीक वादावादी झाली. आपण इतके नमते घेऊनही ओमसिंग ऐकत नसल्याने तरुणीचा संताप अनावर झाला. तिने ओमसिंगवर बोच-या शब्दाचे प्रहार सुरु ठेवतच काचेच्या बाटलीतून सोबत आणलेले अॅसिड त्याच्या अंगावर फेकले व तिथून पळ काढला. स्थानिकांनी गंभीर जखमी झालेल्या ओमसिंगला रुग्णालयात दाखल केले. गोरेगाव पोलीस फरार तरुणीचा शोध घेत आहेत.