‘प्राइम टाइम’ची शोभा!
By Admin | Updated: April 9, 2015 02:56 IST2015-04-09T02:56:01+5:302015-04-09T02:56:01+5:30
मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना ‘प्राइम टाइम’ देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हुकूमशहा संबोधणा-या प्रसिद्ध लेखिका शोभा डे

‘प्राइम टाइम’ची शोभा!
मुंबई : मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना ‘प्राइम टाइम’ देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हुकूमशहा संबोधणा-या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला; परंतु सभापती हरिभाऊ बागडे यांनी ती साफ फेटाळून लावला.
राज्यातील मिल्टप्लेक्स सिनेमागृहांत प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती केली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी करताच शोभा डे यांनी फडणवीस सरकार ‘हुकूमशहा’ असल्याचे ट्विट केले. ‘आधी गोवंश हत्याबंदी, आता मराठी सिनेमा, नको नको, ये सब रोको’, असे आणखी एक टिष्ट्वट करून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बुधवारी डे यांच्याविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. प्रताप सरनाईक यांनी प्रस्ताव आणला. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची प्रतिक्रिया सभागृहाबाहेर दिली. परंतु हक्कभंगाची नोटीस द्यायला हवी, असे सांगत सभापतींनी प्रस्ताव फेटाळला. आपल्या विरोधात हक्कभंग आणला जात असल्याची माहिती मिळताच शोभा डे यांनी ‘हक्कभंगाचा प्रस्ताव आणला? कम आॅन, महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे, तसेच माझे मराठी सिनेमांवर प्रेम आहे आणि ते नेहमीच राहील,’ असे आणखी एक टिष्ट्वट करून खिजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची भावना दुखावली, पण सत्ताधारी भाजपाचे आमदार, कार्यकर्ते मात्र मूग गिळून गप्प बसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (विशेष प्रतिनिधी)