मुंबईकरांनो, दूषित पाण्यापासून सावधान!

By Admin | Updated: July 2, 2016 02:40 IST2016-07-02T02:40:59+5:302016-07-02T02:40:59+5:30

पावसाच्या सुरुवातीलाच दूषित पाण्यामुळे मुंबईकर आजारी पडल्याचे दिसून आले आहे.

Be warned of contaminated water, Mumbaikars | मुंबईकरांनो, दूषित पाण्यापासून सावधान!

मुंबईकरांनो, दूषित पाण्यापासून सावधान!


मुंबई : पावसाच्या सुरुवातीलाच दूषित पाण्यामुळे मुंबईकर आजारी पडल्याचे दिसून आले आहे. काविळीमुळे वडाळा येथील पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या कॉलरा, गॅस्ट्रोच्या आजाराचे रुग्णही जून महिन्यात आढळून आले. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर विशेष लक्ष द्या, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
वडाळा येथील ५ वर्षांच्या मुलाला काविळीच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने या मुलाला १७ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. २२ जून रोजी या मुलाचा मृत्यू झाला. जून महिन्यात कावीळचे एकूण १६६ रुग्ण आढळून आले आहेत. तर, जून २०१५मध्ये कावीळचे ९९ रुग्ण होते. गॅस्ट्रोचे जून महिन्यात ९७९ रुग्ण आढळून आले आहेत. तर कॉलराचा १ रुग्ण आढळून आला आहे.
त्यामुळे पावसाच्या सुरुवातीलाच साथीच्या आजारांचा आलेख चढता असल्यामुळे काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेने केला आहे.(प्रतिनिधी)
>हेपिटायटिसचा असा होतो संसर्ग
हेपिटायटिस विषाणूंमुळे होतो. पण, त्याचबरोबर संसर्ग आणि टॉक्सीकमुळेही हेपिटायटिस होऊ शकतो. हेपिटायटिसचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘ई’ हे प्रमुख पाच विषाणू आहेत. ‘ए’ आणि ‘ई’ विषाणूचा संसर्ग हा दूषित पाणी आणि अन्नामुळे होतो.
अस्वच्छतेमुळे या विषाणूंचा संसर्ग होतो. हेपिटायटिय ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ या विषाणूंचा संसर्ग रक्त आणि रक्तातील घटकांमधून संक्रमित होतो. वापरलेल्या सुईचा पुन्हा वापर करणे, शरीरसंबंधातून हे विषाणू संक्रमित होतात.
हेपिटायटिसपासून बचाव करण्यासाठी हे उपाय करा
शारीरिक स्वच्छता राखा, शौचालयात जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुवा, जेवण तयार करण्याआधी, जेवण्याआधी हात स्वच्छ धुवा, स्वच्छ पाणी प्या, उघड्यावरचे अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी साठवून ठेवलेले पाणी पिणे टाळा
अन्न शिजवल्यावर झाकून, स्वच्छ जागी ठेवा, पालेभाज्या, सलाड स्वच्छ धुऊन घ्या, घरी शिजवलेले अन्न खा, रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाणे टाळा (चायनीज भेळ, पाणीपुरी इत्यादी.)
गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कावीळ होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात गर्भवती महिलांनी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर खाण्याच्या सवयींवर विशेष लक्ष दिले पाहिजे. नॉशिया, उलट्या अशी लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.

Web Title: Be warned of contaminated water, Mumbaikars