ध्येयाशी प्रामाणिक राहा
By Admin | Updated: September 10, 2014 00:46 IST2014-09-10T00:46:15+5:302014-09-10T00:46:15+5:30
आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण

ध्येयाशी प्रामाणिक राहा
करिअर महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद : लोकमत युवा नेक्स्ट व आकार फाऊंडेशनचा उपक्रम
नागपूर : आयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही, लक्ष्याच्या प्राप्तीपर्यंत थांबू नका, हा गुरुमंत्र स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिला.
लोकमत युवा नेक्स्ट व आकार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महर्षी व्यास सभागृहात आयोजित या महोत्सवाला विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे आदिवासी कल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे उपसंचालक संदीप साळुंखे, एस.डी.एम. रमेश घोलप, भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी सुनील आगवणे, प्रा. हुड्डा, तहसीलदार प्रकाश वाघमारे व आकार संस्थेचे संयोजक राम वाघ व रुपेश घागी उपस्थित होते.
आपल्या प्रभावी मार्गदर्शनात डॉ. दराडे म्हणाल्या, जीवनात प्रत्येकाला स्वत:च स्वत:चा आदर्श होता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीत चांगले आणि वाईट ओळखण्याची जाणीव निर्माण झाली पाहिजे. जगाने आपल्याला काय दिले हे महत्त्वाचे नाही, तर आपण जगाला काय दिले, हे महत्त्वाचे आहे. समाजाला धनाऐवजी चांगले विचार द्यायचे असतात. यश मिळविण्यासाठी विश्वासार्हता, नीतीमत्ता या मार्गाचे पालन केले पाहिजे. अनुभव ही सर्वांत मोठी संपत्ती आहे. सकारात्मक दृष्टिकोन यशाचा मार्ग खुला करतो असेही त्या म्हणाल्या. अवगुण प्रत्येकांमध्ये असतात. परंतु यावर मात करीत खडतर परिश्रमाने यशाचे शिखर गाठणारे अनेक जण समाजात आहेत. त्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेतली पाहिजे, असे विचार संदीप साळुंखे यांनी मांडले. रमेश घोलप म्हणाले, नशिबाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही तर निश्चित ध्येय, आत्मविश्वास, धीर न सोडण्याचा स्वभाव, मेहनत व सातत्य यामुळेच घवघवीत यश पदरी पडते.
डॉ. दराडे यांच्या हस्ते ‘डब्ल्यू.डब्ल्यू.डब्ल्यू. आकार फाउंडेशन.ओआरजी’ संकेतस्थळाचे लोकार्पण झाले. संस्थेचे संयोजक राम वाघ आणि रूपेश घागी यांनी सांगितले, संस्थेच्यावतीने १० ते १२ जानेवारी २०१५ रोजी स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या नि:शुल्क प्रशिक्षणासाठी ५०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. (प्रतिनिधी)