सावधान, चिमुकल्यांना आता ‘हिब’चा विळखा!

By Admin | Updated: November 29, 2015 01:57 IST2015-11-29T01:57:29+5:302015-11-29T01:57:29+5:30

बदलती जीवनशैली नवनवीन आजारांना जन्माला घालत आहे. ‘हिब’ या नावाच्या नव्यानेच समोर आलेल्या आजाराने एक वर्ष वयोगटाआतील बालकांना आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली असून

Be careful, check out 'Hib' now! | सावधान, चिमुकल्यांना आता ‘हिब’चा विळखा!

सावधान, चिमुकल्यांना आता ‘हिब’चा विळखा!

- संतोष वानखडे, वाशिम

बदलती जीवनशैली नवनवीन आजारांना जन्माला घालत आहे. ‘हिब’ या नावाच्या नव्यानेच समोर आलेल्या आजाराने एक वर्ष वयोगटाआतील बालकांना आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली असून, या आजाराचा बीमोड करणे आरोग्य यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
‘हिब’ हे हिमोफिलीस इन्फ्लुएन्झा टाइप बी याचे संक्षिप्त रूप आहे. या प्रकारच्या जीवाणूमुळे गंभीर प्रकारचा संसर्ग होण्याचा धोका आरोग्य विभागाने वर्तविला आहे. वर्षभरात जागतिक पातळीवर पाच वर्षांआतील ३ लाख ७० हजारांहून जास्त बालके हिबमुळे दगावली असून, त्यामध्ये भारतातील बालकांचे प्रमाण २० टक्के असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
हिबचा जीवाणू, संसर्ग झालेल्या बालकाच्या खोकल्यातून अथवा शिंकेतून उडालेल्या थेंबाद्वारे अन्य बालकांमध्ये संक्रमित होतो. बालके जेव्हा तोंडात घातलेली खेळणी आणि अन्य वस्तू एकमेकांना देतात, तेव्हादेखील हिबचा प्रसार होतो. या आजाराचा चार ते अठरा महिने वयोगटातील बालकांना सर्वाधिक धोका असतो.
या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय लसीकरण उपक्रमांतर्गत ‘पेंटावॅलंट’ लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून, एक वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना ही लस मोफत दिली जाणार आहे. डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, कावीळ व हिब (हिमोफीलस एन्फ्लुएन्झा टाइप बी) या पाच प्राणघातक आजारांच्या प्रतिबंधासाठी बाळांना आता ‘पेंटावॅलंट’ ही एकच लस दिली जाणार आहे.

‘हिब’पासून होणारा संसर्ग...
बॅक्टेरियल मेनिंजायटिस - मज्जारज्जू आणि मेंदूला झाकणाऱ्या पटलांना आलेली दाहक सूज. हा अतिशय गंभीर प्रकारचा संसर्ग आहे
न्युमोनिया - फुप्फुसांना आलेली दाहक सूज
सेप्टिसेमिया - रक्तामध्ये असलेले संसर्गजन्य जीवाणू
सेप्टिक आर्थ्रायटिस - सांध्यांना आलेली दाहक सूज
एपिग्लोटायटिस - स्वरयंत्राच्या आसपासच्या जागेला आलेली दाहक सूज आणि श्वसन नलिकेत आलेला अडथळा.

‘हिब’ हा बालकांसाठी गंभीर स्वरूपाचा आजार आहे. भारतासह जागतिक पातळीवर या आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. या आजारातून वाचलेल्या बालकांना कायमचे अपंगत्व, कर्णबधिरता अथवा त्यांच्या मेंदूला हानी पोहोचू शकते.
- डॉ. दीपक सेलोकार,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम

Web Title: Be careful, check out 'Hib' now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.