स्मार्ट शहरे उभी करून सक्षम व्हा! - मुख्यमंत्री
By Admin | Updated: February 26, 2015 05:57 IST2015-02-26T05:57:23+5:302015-02-26T05:57:23+5:30
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पैसा नाही आणि २५ हजार कोटी रुपयांची कामे सुरु करून ठेवली आहेत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र

स्मार्ट शहरे उभी करून सक्षम व्हा! - मुख्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पैसा नाही आणि २५ हजार कोटी रुपयांची कामे सुरु करून ठेवली आहेत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नाराजी प्रकट केली. महामंडळाला त्यांच्याकडील जमिनीवर स्मार्ट शहरे उभी करून आपल्या पायावर उभे राहण्याचा सल्ला दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्पांचे सादरीकरण झाले. त्यानंतर या प्रकल्पांकरिता निधी उभारण्याचा विषय उपस्थित झाल्यावर महामंडळाची झोळी रिती असल्याचे रडगाणे उपस्थित अधिकाऱ्यांनी गाण्यास सुरुवात करताच फडणवीस म्हणाले की, एमएमआरडीएने जमीन विकसीत करून आर्थिक सक्षमता प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेलगतच्या आपल्या जमिनीवर स्मार्ट शहरे उभी करून आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे, असे ते म्हणाले. तातडीने कोणते प्रकल्प हाती घेता येतील त्याचा प्राधान्यक्रम ठरवून मगच कामे हाती घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
टोलबाबत पर्याय सुचवा
टोलबाबत निर्णय घेण्याकरिता राज्य सरकारने समिती नियुक्त केली असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी टोलमधून जनतेला कसा दिलासा देता येईल याबाबत प्रस्ताव देण्याचे आवाहन रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केले. (प्रतिनिधी)