दास्यमुक्तीसाठी रणरागिणींचा लढा
By Admin | Updated: January 3, 2015 01:28 IST2015-01-03T01:28:11+5:302015-01-03T01:28:11+5:30
नगर जिल्ह्यात २०१४मध्ये ७५७ महिलांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने स्वत:ची कौटुंबिक छळातून मुक्तता व्हावी, यासाठी यशस्वी लढा दिला़ त्यांच्या संघर्षाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

दास्यमुक्तीसाठी रणरागिणींचा लढा
साहेबराव नरसाळे - अहमदनगर
स्त्री दास्यमुक्तीसाठी महिलांना शिक्षित करण्याचा आग्रह धरणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आज महिला मुक्ती दिन म्हणून साजरा होत असताना नगर जिल्ह्यात २०१४मध्ये ७५७ महिलांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने स्वत:ची कौटुंबिक छळातून मुक्तता व्हावी, यासाठी यशस्वी लढा दिला़ त्यांच्या संघर्षाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
महिलांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी व त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी सावित्रीबार्इंनी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली़ मात्र, पुरुषप्रधान व्यवस्थेत आजही ग्रामीण भागात ‘चूल आणि मूल’ एवढ्याच मर्यादित कक्षेत महिलांना वागविले जाते़ त्यामुळे त्यांना हक्कापासून वंचित राहावे लागते़ अनेक महिला वर्षानुवर्षे कौटुंबिक छळ मुकाट्याने सहन करतात़ पीडित महिलांना न्याय देण्यासाठी सरकारने महिला सुरक्षा कायदा लागू केला़ त्याअंतर्गत तक्रार करणाऱ्यांमध्ये शिक्षित महिलांचे प्रमाण अधिक आहे़ या कायद्यांतर्गत २० हजार रुपये दंड आणि एक वर्षाचा कारावास, अशा शिक्षेची तरतूद आहे.या कायद्यामुळे महिलांचा छळ होण्याचे प्रमाण सुमारे २़१३ टक्क्यांनी घटल्याचे महिला सहायता केंद्रातून सांगण्यात आले़
सासू-सासऱ्यांची सेवा न केल्यामुळे, इतर कारणातून, चांगला स्वयंपाक न बनविता येणे, विविध कारणांसाठी पैशांची मागणी करणे आदी कारणांतून महिलांचा छळ केला जातो़ त्यास कंटाळून अनेक महिला पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावतात़ एप्रिल २०१४पासून डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत ७५७ महिलांनी वेळेवर जेवायला न देणे, मारहाण करणे, जास्त काम करण्यास सांगणे, हक्क नाकारणे, अपमानास्पद बोलणे आदी कारणांद्वारे छळ होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहायता कक्षाकडे केल्या आहेत़
च्२८२ महिलांचे पती, सासू-सासरे व अन्य नातेवाईक यांचे समुपदेशन करून महिला सहायता कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांनी पीडित महिलांना न्याय मिळवून दिला. तर २०५ महिलांनी कोर्टाच्या माध्यमातून कौटुंबिक छळातून मुक्तता करून घेतली. एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत महिला सहायता कक्षाकडे आलेल्या तक्रारींपैकी ३५ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली नाही़ त्यामुळे पोलीस ठाण्यात ३५ कौटुंबिक छळाचे गुन्हे नोंदविण्यात आले.