दुष्काळग्रस्तांना ‘रोटी बँक’चा आधार
By Admin | Updated: April 30, 2016 02:22 IST2016-04-30T02:22:23+5:302016-04-30T02:22:23+5:30
पाण्याअभावी संपूर्ण राज्यालाच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यामुळे सर्व स्तरातून पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दुष्काळग्रस्तांना ‘रोटी बँक’चा आधार
मुंबई : पाण्याअभावी संपूर्ण राज्यालाच दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यामुळे सर्व स्तरातून पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही काळात मुंबईवर पाणीटंचाईची परिस्थिती ओढावू नये, याकरिता गेल्या काही दिवसांत समाजातील सर्व घटकांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनीही यासाठी पुढाकार घ्यायचे ठरविले आहे.
१ मे रोजी कामगार दिनाचे निमित्त साधून डबेवाले घरोघरी पाणी वाचविण्याचा संदेश देणार आहेत. यात डबेवाले मुंबईकरांना ‘पाणी कमी वापरा’, ‘पाण्याचा अपव्यय टाळा’ असे आवाहन करणार आहेत. डब्याच्या माध्यमातून २ लाख ग्राहकांच्या घराघरांत पोहोचणारे डबेवाले ही मोहीम एक आठवडा राबविणार आहेत.
अन्न-पाण्याच्या शोधात मुंबईत विसाव्याला आलेल्या दुष्काळग्रस्तांनाही डबेवाल्यांनी आधार द्यायचे ठरविले आहे. ‘रोटी बँक’च्या माध्यमातून दररोज शेकडो भुकेलेल्यांना ते अन्न देतात. याच रोटी बँकच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना ‘मायेचा घास’ डबेवाले देणार आहेत. याविषयी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले की, समाजातील समस्यांवर मात करण्यासाठी डबेवाल्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. याच सामाजिक जाणिवेतून डबेवाल्यांनी ही अभिनव मोहीम हाती घेतली असून, या माध्यमातून जास्तीत जास्त दुष्काळग्रस्तांना आधार देण्याचा मानस आहे. (प्रतिनिधी)