बायपासच्या दुरुस्तीत केला हद्दीचा बहाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2016 02:41 IST2016-09-05T02:41:30+5:302016-09-05T02:41:30+5:30
सतत चर्चेत राहणारा मुंब्रा बायपास रस्त्याचा काही भाग रायगड जिल्ह्याच्या बांधकाम विभागाच्या हद्दीत आहे

बायपासच्या दुरुस्तीत केला हद्दीचा बहाणा
सुरेश लोखंडे,
ठाणे- सतत चर्चेत राहणारा मुंब्रा बायपास रस्त्याचा काही भाग रायगड जिल्ह्याच्या बांधकाम विभागाच्या हद्दीत आहे. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती वेळेवर होत नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
याआधी मुंब्रा शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असे. ऐन रहदारीच्या ठिकाणी होत असलेली ही कोंडी दूर करण्यासाठी मुंब्रा डोंगराच्या कडेने हा बायपास तयार करण्यात आला आहे. यातील बहुतांशी भाग हा ठाणे बांधकाम विभागाच्या नियंत्रणात असून काही भाग रायगड बांधकाम विभागाच्या नियंत्रणात असल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या
बैठकीत उघड झाले. यामुळे या भागातील रस्ता वेळेवर दुरुस्त करणे शक्य होत नसल्याची तक्रार या बैठकीत झाली.
या बायपास रस्त्यावरून बहुधा अवजड वाहने येजा करतात. पावसाच्या या कालावधीत दरडीदेखील कोसळल्याच्या घटना या रस्त्यावर झाल्या आहेत. तर, मुंब्य्राचा रहिवासी भाग या रस्त्याच्या
खालच्या बाजूला असल्यामुळे अपघातग्रस्त वाहनापासून या भागाला धोकादेखील आहे. याशिवाय, या रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या पावसात वाहून गेल्या असल्यामुळे दोन्ही बाजू धोकादायक झाल्या आहेत.
या बायपास रस्त्यावरील भारत गिअर कंपनीजवळील उतारावरील रस्ता अतिपावसामुळे वाहून गेल्याची तक्रार डीपीसीत केली होती. त्यास दुरुस्त करण्याची टाळाटाळ ठाणे बांधकाम विभागाने केल्यामुळे या रस्त्याचा काही भाग हा रायगड जिल्ह्याच्या बांधकाम विभागाकडे असून त्यात हस्तक्षेप करता येत नसल्याचे ठाण्याच्या बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
>रस्ता होणार दुरुस्त
काही झाले तरी हा रस्ता ठाणे बांधकाम विभागाने स्वत: लक्ष घालून दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
हा भाग रायगडकडे असल्याचा बहाणा न करता खास लक्ष घालून हा बायपास रस्ता तत्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची तंबी त्यांनी बांधकाम विभागाला डीपीसीत दिली. यामुळे हा रस्ता दुरुस्तीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.