अवघी मुंबापुरी झाली ‘बाप्पा’मय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2016 06:10 IST2016-09-05T06:10:10+5:302016-09-05T06:10:26+5:30
वर्षाचे ३६५ दिवस कायम धावपळीत असलेला मुंबईकर लाडक्या श्रीगणेशाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अवघी मुंबापुरी झाली ‘बाप्पा’मय...
मुंबई : वर्षाचे ३६५ दिवस कायम धावपळीत असलेला मुंबईकर लाडक्या श्रीगणेशाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींपासून घरगुती गणेशमूर्तींच्या स्वागतासाठी मुंबापुरीतला उत्साह ओसंडून वाहत आहे. शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे मुंबापुरीत आनंदलहरी उसळत आहेत.
गणरायाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असताना त्यांच्या उत्साहात कसलीही बाधा येऊ नये, यासाठी ३० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा मुंबईत तैनात असणार आहे. मिरवणुकांवर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद वस्तू, व्यक्तींबाबत पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी केले आहे.
मुंबईतल्या गिरगाव आणि लालबाग-परळसारख्या मराठमोळ्या वस्तीत गणेशोत्सवाची लगबग आधीपासूनच सुरू झाली आहे. दादर, अंधेरीसह घाटकोपरसारख्या मोठ्या बाजारपेठांत खरेदी-विक्रीचा उत्साह ओसंडून वाहत अहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे, नेत्रोद्दीपक रोशणाई आकर्षण ठरत आहे. श्रींच्या नैवेद्यांसाठी मिठाई आणि गोडाधोडाच्या बाजारपेठांतली गर्दी ‘ओव्हरफ्लो’ झाली आहे; तर फुलांच्या मार्केटमध्ये दरवळणाऱ्या सुगंधाने बाप्पाची आरास आणखीच बहारदार झाली आहे. गणेशगल्ली, फोर्ट, गिरगाव, अंधेरी, वांद्रे, दादरसह चेंबूरमधील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाच्या सेवेसाठी दहा दिवस स्वत:ला वाहून घेतले आहे. (प्रतिनिधी)