उत्साहात, जयघोषात आले बाप्पा...

By Admin | Updated: September 6, 2016 01:11 IST2016-09-06T01:11:49+5:302016-09-06T01:11:49+5:30

गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचे ढोल -ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत आणि भक्तिपूर्ण अशा वातावरणात मोठ्या थाटात स्वागत केले.

Bappa came to Jihoosha ... | उत्साहात, जयघोषात आले बाप्पा...

उत्साहात, जयघोषात आले बाप्पा...


पुणे : जिल्ह्यातील आबालवृद्धांसह साऱ्या गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचे ढोल -ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत आणि भक्तिपूर्ण अशा वातावरणात मोठ्या थाटात स्वागत केले. जिल्ह्यात घराघरांत गणरायाची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा झाली. अनेक सार्वजनिक गणेशमंडळांनी वाजतगाजत गणरायाला आणले. पुणे जिल्ह्यात अष्टविनायकांपैकी सहा गणपती असल्याने भक्तिमय वातावरणात या सर्व ठिकाणी मिरवणूक काढून गणेशाची विधिवत पूजा करण्यात आली व लाखो भक्तांनी दर्शनासाठी रीघ लावली.
पुष्पपाकळ्यांची उधळण
ओझर : भाद्रपद चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पा मोरयाच्या नामघोषात भजनाद्वारे साधू मोरया गोसावींची पदे म्हणत पुष्पपाकळ्यांची उधळण करत मंगलमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत अष्टविनायकातील मुख्य स्थान श्री क्षेत्र ओझर येथे सोमवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी भक्तीच्या परमोच्च क्षणांच्या परिपूर्णतेचा कळस गाठत श्रींचा जन्मोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विघ्नहर्त्या गणरायाचे मंदिर गाभारा, आवार आणि मंदिराबाहेरील परिसरातील गणेश भक्तांच्या प्रचंड गर्दीने व श्रींच्या नामघोषामुळे परिसरातील वातावरण मंगलमय झाले होते. चौथ्या द्वारयात्रेसाठी टाळ-मृदंगाच्या गजरात भजने म्हणत सकाळी १० वाजता श्रींची पालखी ओझर येथील आंबेराई येथे रवाना झाली. त्याठिकाणी पृथ्वी, सूर्य पूजा करून श्रींच्या पालखीचे बारा वाजता मंदिरात आगमन झाले. ग्रामस्थ भालचंद्र कवडे गुरुजी, भालचंद्र रवळे, देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी, विश्वस्त बबन मांडे, रामदास मांडे, विक्रम कवडे, बाळासाहेब कवडे, साहेबराव मांडे जगदाळे आदींचा गणपती बाप्पा मोरयाच्या नामघोषात श्रींचा जन्मोत्सव सोहळा पार पडला.
देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे, सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे, सर्व विश्वस्त, देवस्थानचे व्यवस्थापक, कर्मचारी यांनी श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे नियोजन केले.
रांजणगाव गणपती : गणेश चतुर्थीचे औचित्य साधून गणेश भकतांनी मोठया भकतीभावाने लाखो भाविकांनी महागणपतीचे दर्शन घेतल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नारायण पाचुंदकर व उपाध्यक्ष डॉ. संतोष दुंडे यांनी सांगितले.
परपंरेनुसार अंनत चतुर्थीच्या दिवशी सकाळी ९ वाजता श्रींची महापूजा, महानैवेद्य व सहस्त्रावर्तने असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. दु.१२.३० वा. श्रींच्या पालखीचे प्रथेनुसार ढोकसांगवी गावाकडे तुतारीच्या निनादात वाजत गाजत प्रस्थान झाले, असे राजेंद्र देव महाराज यांनी सांगितले. यावेळी शेळके आळीतील मानकऱ्यासंह देवस्थानचे विश्वस्त, ग्रामस्थ उपस्थित होते. सायंकाळी सपना साखरे करमाळा यांचे सुश्राव्य किर्तन झाले. सायंकाळी श्रींचे मंदिरात आगमन झाले. आच्छादित दर्शन मंडप केल्याने शिस्तबध्द पध्दतीने महागणतीच्या दर्शनाचा लाभ घेता आला. सचिव अ‍ॅड विजय दरेकर यांनी सांगितले. यात्रा उत्सव काळात रांजणगावचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आबालवृध्दासंह कुटुंबियांनी महागणपतीचे दर्शन घेतले. मंदिर व परिसरात केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.
>मयूरेश्वर दर्शनासाठी
लाखो भाविक
मोरगाव : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मोरगाव दुमदुमले. गणेश चतुर्थी, द्वारयात्रेची सांगता व गणेश स्थापनेचा मुहुर्त साधून मोरगाव येथे राज्यभरातील गणेश भक्तांनी ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गणेश कुंडापर्यंत रांगा लावल्या होत्या. पहाटे चार ते रात्री उशिरापर्यंत सुमारे पाऊण लाख भाविकांनी दर्शन घेतले. सोमवारी (दि. ५) गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे गुरव मंडळींची प्रक्षाळ पुजा झाल्यानंतर मयूरेश्वराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. द्वारयात्रेचा शेवटचा टप्पा मोक्ष द्वार मंडप येथे सांगता झाली.
>भाद्रपदी यात्रेच्या निमित्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती. दुपारी १ वाजता ‘श्रीं’ची महापुजा करण्यात आली. दिवसभर दर्शनासाठी रांगा सुरूच होत्या. गणेश चतुर्थी निमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्दर्शनाखाली पोलीस उपनिरीक्ष आशिष जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंगळवार (दि. ६) मुक्तद्वार दर्शनाचा शेवटचा दिवस आहे.

Web Title: Bappa came to Jihoosha ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.