सध्या राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात जबरदस्त चर्चा सुरु आहे. यासंदर्भात आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही भाष्य केले आहे. यावेळी राणे यांनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवत, राज्याच्या राजकारणातून ठाकरे ब्रँड संपण्याचे थेट कारण सांगितले. ते तुळजापूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते.
"बापरे...! आम्ही एवढे घारलो आहोत की, आम्हाला झोप लागत नाहीये..." -राणे म्हणाले, "दोन भाऊ, कुणाचे कुटुंब एकत्र येत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे. यावर, दोन भाऊ एकत्र आले तर, पालिका निवडणुकीसाठी अडचण येणार नाही का? असा प्रश्न केला असता, राणे म्हणाले, "महाराष्ट्राच्या जनतेने २०२४ ला एकाला २० आणि एकाला शून्य आमदार दिले आहेत. भरपूर ताकद आहे. आम्ही एवढे घारलो आहोत की, आम्हाला झोप लागत नाहीये. एवढी भीती वाटतेय आम्हाला. आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय, मला घाम आलाय की, आता आमचं कसं होणार? केवढी ताकद आहे हो, एकाकडे २० आमदार आहेत, दुसऱ्याकडे शून्य आहेत. बापरे...! आणि आमच्याकडे तर १३२ आहेत हो... कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर. आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता...
"ठाकरे ब्रँड हा हिंदुत्व सोडल्याने संपला" -राज्याच्या राजकारणात ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे अशा आशयाचा प्रश्न विचारला असता नितेश राणे म्हणाले, "ठाकरे ब्रँड हा हिंदुत्व सोडल्याने संपला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व हे अतूट नाते आहे. ज्यांनी ज्यांनी हिंदुत्व सोडले ते रसातळाला गेले आहेत.