“दोनदा मंत्री, ४ वेळा पक्ष बदलले, १५ वर्षे विकासापासून वंचित”; दीपक केसरकरांविरोधात बॅनरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 01:07 PM2023-11-17T13:07:23+5:302023-11-17T13:12:03+5:30

Deepak Kesarkar: तुम्हाला अजून किती संधी द्यायची? भाई, आता पुरे, थांबा आता, अशा आशयाचे दीपक केसरकर यांच्याविरोधातील बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले होते.

banner against shiv sena shinde group minister deepak kesarkar | “दोनदा मंत्री, ४ वेळा पक्ष बदलले, १५ वर्षे विकासापासून वंचित”; दीपक केसरकरांविरोधात बॅनरबाजी

“दोनदा मंत्री, ४ वेळा पक्ष बदलले, १५ वर्षे विकासापासून वंचित”; दीपक केसरकरांविरोधात बॅनरबाजी

Deepak Kesarkar: गेल्या काही दिवसांपासून राज्यात बॅनरबाजीला वेग आल्याचे दिसत आहे. सत्ताधारी तसेच विरोधकांमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यसभरात बॅनर झळकले. त्यावरून आरोप-प्रत्यारोपही झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात तळकोकणात बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. २ वेळा मंत्री, ४ वेळा पक्ष बदलले. तरीही आम्ही १५ वर्षांपासून विकासापासून वंचित राहिलो असून, अजून किती संधी द्यायची? अशी विचारणा करण्यासह ‘भाई...आता पुरे, थांबा आता’, अशा आशयाचे बॅनर लागले होते. 

दोडामार्ग येथे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक लढवणार नसून, विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर काही अज्ञातांकडून ऐन दिवाळीत हे बॅनर लावण्यात आले होते. दीपक केसरकर समर्थकांनी पोलिसांकडे यासंदर्भात निवेदन दिल्यानंतर हे बॅनर हटविण्यात आले; मात्र ते बॅनर नेमके लावले कोणी? याचे गूढ कायम असल्याचे सांगितले जात आहे. 

प्रत्येक वेळाक नवीन नवीन काय काय सांगल्यात

दोन वेळचे नगरसेवक, एकदा नगराध्यक्ष, तीन वेळा आमदार, एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री, चार वेळा पक्ष बदलल्यात आणि आता तर शिक्षणमंत्री. तुमी वरती चढत गेल्यात आणि प्रत्येक वेळाक नवीन नवीन काय काय सांगल्यात. आमका पटत गेला. हत्तींच्या वेळाक तसा, पूर इलो तेवा तसा, शेतीचा नुकसान झाला तेव्हा तसा आणि तुम्ही स्वतः शिक्षणमंत्री असानव आमच्या दोडामार्गातल्या ९० टक्के शाळा बंद पडले हत, असा कितकेंदा झाला. आता तर आमच्या दोडामार्गातली आरोग्य व्यवस्था संपल्यात जमा आसा. लोकांका साधो सर्दी, ताप इलो तरी गोयात जावचा लागता. हाल्लीच्या हाल्ली दोडामार्ग हॉस्पिटलातली बाळंतपाणा बंद झाली. दोन म्हयन्यात ५४ बाळंतपणा गोयात झाली. मागच्या १५ वर्षात जग खय गेला आणि आमी थयच रवलो. आता तुमका अजूनय वेळ दिव म्हणतासात. हेच्यापेक्षा आणखी वेगळा काय करतल्यात? असा आशय लिहिलेले बॅनर लावण्यात आले होते. 

दरम्यान, दोडामार्ग रुग्णालयातील आरोग्य सेवा रामभरोसे आहे. कंत्राटी डॉक्टरांनी राजीनामा दिला असून गेली दोन महिने महिला प्रसूती कक्ष बंद आहे. आपण पंधरा वर्षे आमदार, दोन वेळा मंत्री आणि चारवेळा पक्ष बदलून देखील दोडामार्गातील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला अजून किती संधी द्यायची? भाई, आता पुरे, थांबा आता, असा शेवट या बॅनरवर होता.


 

Web Title: banner against shiv sena shinde group minister deepak kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.