बँकांनो, जमा नोटांची माहिती लगेच द्या!
By Admin | Updated: December 31, 2016 01:27 IST2016-12-31T01:27:52+5:302016-12-31T01:27:52+5:30
३0 डिसेंबर रोजी नोटाबंदीची मुदत संपताच जमा झालेल्या नोटांची माहिती त्याच दिवशी तत्काळ रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले आहेत.

बँकांनो, जमा नोटांची माहिती लगेच द्या!
मुंबई : ३0 डिसेंबर रोजी नोटाबंदीची मुदत संपताच जमा झालेल्या नोटांची माहिती त्याच दिवशी तत्काळ रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्याचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले आहेत.
चलनातून बाद केलेल्या नोटा बँकांत जमा करण्याची ३0 डिसेंबर रोजी संपली. आता त्याच दिवशी जमा झालेल्या नोटांचा तपशील सादर करा, असे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना बजावले आहे. सर्व शाखांमध्ये जमा झालेल्या नोटांची एकत्रित करून ती रिझर्व्ह बँकेकडे सादर करायची आहे. त्याच प्रमाणे जमा झालेल्या जुन्या नोटा ३१ डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँकेत अथवा कोषागारात जमा करण्याचे आदेशही बँकांना दिले आहेत. बँकांना ३१ डिसेंबर रोजी कामकाज संपल्यानंतर रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वत:कडे ठेवता येणार नाही. जिल्हा बँका मात्र १0 नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या काळात आपल्या शाखांत जमा झालेल्या नोटा पुढील आदेश येईपर्यंत स्वत:कडे ठेवू शकतात, असे बँकेने म्हटले. जिल्हा बँकेत जमा झालेल्या नोटांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. (वाणिज्य प्रतिनिधी)
माहितीसाठी यंत्रणा
८ नोव्हेंबर ते ३0 डिसेंबर या काळात बँकांकडे मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा जमा झाल्या. त्या साठविण्याची व्यवस्था करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांना दिले होते.
या ५0 दिवसांच्या काळात गोळा झालेल्या सर्व जुन्या नोटांची माहिती सादर करण्यासाठी इंटिग्रेटेड कॉम्प्युटराईज्ड करन्सी अँड मॅनेजमेंट सिस्टिमची व्यवस्था केली आहे.