सोलापुरात ३०० कोटींचे बँक व्यवहार ठप्प
By Admin | Updated: July 29, 2016 18:13 IST2016-07-29T18:13:23+5:302016-07-29T18:13:23+5:30
केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सरकारी बँकांच्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या एक दिवसाच्या संपामुळे सोलापूर जिल्ह्यातील ३०० कोटी रूपयांचे

सोलापुरात ३०० कोटींचे बँक व्यवहार ठप्प
सरकारी बँकांचा संप : साडेतीन हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग
सोलापूर : असोसिएट बँकांचे स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सरकारी बँकांच्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या एक दिवसाच्या संपामुळे सोलापूर जिल्ह्यातील ३०० कोटी रूपयांचे बँक व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील विविध सरकारी बँकांच्या २६० शाखांमधील ३५०० कर्मचाऱ्यांनी या संपात भाग घेतला होता.
युनायटेड फोरम आॅफ बँक असोसिएशनच्या नेतृत्त्वाखाली देशभरात हा संप पुकारण्यात आला होता. विविध संघटनांशी संबंधित असलेले सुमारे दोनशे कर्मचारी बाळीवेस येथील स्टेट बँकेसमोरजमा झाले. तेथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून दीड तास निदर्शने केली. जिल्ह्यातील बँकांमधील धनादेश क्लिअरींग, रक्कम काढणे, भरणे, आरटीजीएस आदी सर्व सेवा बंद असल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली.
युनायटेड फोरमचे निमंत्रक गोपाळ गायकवाड यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या या धोरणामुळे सरकारी बँका बंद होतील. स्पर्धेमुळे सामाजिक बँकींग प्रभावित होईल. देशाच्या आर्थिक विकासात बँकांची भूमिका मोठी आहे. यामुळे विकासावरही विपरित परिणाम होईल. एकाच बँकेत सर्व बँका विलीन होणार असल्यामुळे एकाधिकार वाढीस लागेल. बँकांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी आणि अधिकारी अतिरिक्त होतील. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बळकट केले पाहिजे.
या आंदोलनात गायकवाड यांच्यासह प्रकाश जाधव, वीरभद्र माळगे, अंबिका डोळ्ळे, रजनी कुलकर्णी, रोहिणी दुस्सल, अलमेदा, जयतीर्थ पडगानूर, अधिकारी संघटनेचे धनंजय शेंडे, अंगद पाटील यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.