दिवाळी-लक्ष्मी पूजनाच्या नोटांची बंडले बँकांत जमा
By Admin | Updated: July 10, 2015 21:46 IST2015-07-10T21:46:55+5:302015-07-10T21:46:55+5:30
२००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद होणार : दुकानदार, पेट्रोलपंप चालकांकडूनही अशा नोटा स्वीकारण्यास नकार

दिवाळी-लक्ष्मी पूजनाच्या नोटांची बंडले बँकांत जमा
रमेश पाटील -कसबा बावडा -सन २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा ३१ डिसेंबरनंतर चलनातून बाद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्याजवळील अशा नोटा बँकांतून बदलून घेण्यास सुरुवात केली आहे. काही दुकानदार व पेट्रोलपंप चालकांनीही अशा नोटा स्वीकारण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक वर्षी दिवाळी-लक्ष्मी पूजनाला हळदी-कुंकू लावून पूजण्यात येणाऱ्या त्याच त्या नव्या करकरीत; परंतु एकदम जुन्या (२००५ पूर्वीच्या) नोटांची बंडलेही आता भीतीपोटी बँकेत जमा होऊ लागली आहेत.
रिझर्व्ह बँकेने सुरक्षेच्या कारणामुळे आणि बनावट नोटांना आळा बसावा म्हणून सन २००५ पूर्वीच्या सर्व नोटा व्यवहारातून काढून टाकण्याचा निर्णय एक वर्षापूर्वी घेतला होता. त्याला सर्व स्तरातून आणि सर्व बँकांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. आता अशा नोटा बदलून घेण्याची मुदत संपत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अशा नोटा आहेत त्यांनी त्या बदलून घ्याव्यात, असे आवाहन बँकेने केले आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही नागरिक बँकांमध्ये जाऊन आपल्या खात्यावर पैसे भरत आहेत, तर काही नोटा बदलून घेत आहेत. नोटा बदलून घेण्याचे प्रमाण तुलनेत तसे सध्या कमी असले तरी खास दिवाळी-लक्ष्मी पूजनासाठी ठेवण्यात आलेल्या नव्या परंतु २००५ पूर्वीच्या नोटांची बंडले बदलून घेणाऱ्यांची संख्या जरा जास्त असल्याचे एका बँकेच्या कॅशिअरने सांगितले. या नोटांना हळदी-कुंकू लावलेले असल्यामुळे त्या लक्ष्मी पूजनाच्या असल्याचे दिसून येते.
मुदतीनंतर नोटा बदलून घेण्यासाठी एखादी व्यक्ती बँकेत आली तर अशा नोटा स्वीकारायच्या की नाही याच्या सूचना अद्याप बँकांना आलेल्या नाहीत. त्यामुळे बँकांतही याबाबत संभ्रम आहे. नोटा मुदतीत बदलून घेणे हाच यावर सध्या तरी एकमेव उपाय आहे.
नोटांचे आयुष्य किती ?
१०, २०, ५० रुपयांच्या नोटांचा चलनात जास्त वापर होतो. अशा नोटांचे आयुष्य तीन महिन्यांपर्यंत असते. त्यानंतर त्या एकदम जीर्ण होतात. १०० रुपयांची नोट साधारणत: सतत चलनात फिरली, तर ती एक वर्षापर्यंत टिकते. ५०० व १००० रुपयांच्या नोटांची काळजी लोक बऱ्यापैकी घेत असल्यामुळे त्यांचे आयुष्य दोन वर्षांपर्यंत राहते, अशी माहिती बँक सूत्रांकडून देण्यात आली.
देव-घेववेळी नोटांची तपासणी
आपल्याला एखाद्याने दिलेली नोट खरी की खोटी याची खातरजमा न करता ती २००५ पूूर्वीची आहे का नाही याचीच तपासणी
आता होताना दिसत आहे. पेट्रोल पंपावर
तर नोटेच्या पाठीमागील बाजूचे साल
पाहिले जात आहे. अनेकांना नोटेवर नेमके साल कुठे आहे, हे चटकन समजत नाही.
२००५ च्या नोटा ३१ डिसेंबरनंतर चलनातून बाद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्याजवळील अशा नोटा मुदतीत बदलून घेणे केव्हाही चांगले आहे.
- भास्कर कांबळे, करन्सी चेस्ट इन्चार्ज, बँक आॅफ इंडिया