कर्जाच्या बहाण्याने बँकेची फसवणूक
By Admin | Updated: October 20, 2016 02:57 IST2016-10-20T02:57:31+5:302016-10-20T02:57:31+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेवून बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार घणसोली येथे उघडकीस आला आहे.

कर्जाच्या बहाण्याने बँकेची फसवणूक
नवी मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेवून बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार घणसोली येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वैयक्तिक कर्ज घेवून त्याची परतफेड न करता बँकेची फसवणूक केली आहे.
घणसोली येथील महानगर बँकेच्या शाखेत हा प्रकार घडलेला आहे. सदर बँकेतून वैयक्तिक कर्ज घेवून त्याची परतफेड न करता बँकेची फसवणूक झालेली आहे. नुकताच हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बँकेच्या तक्रारीनुसार कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण सहा जणांचा समावेश आहे. त्यांनी वैयक्तिक कर्जासाठी बँकेकडे अर्ज करून संपूर्ण प्रक्रिया केली होती. त्यानुसार एका प्रकरणात पाच लाख तर दुसऱ्या प्रकरणात साडेतीन लाख रुपये बँकेने कर्ज मंजूर करून दिलेले आहे. मात्र कर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधिताकडून त्याची परतफेड होत नव्हती. त्यामुळे बँकेकडून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
यावेळी त्यांनी बँकेकडे सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. तसेच त्यांचे पत्तेही चुकीचे असल्यामुळे त्यांच्याविरोधात बँकेने पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)