बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र पुणे

By Admin | Updated: July 7, 2016 03:41 IST2016-07-07T03:41:19+5:302016-07-07T03:41:19+5:30

एक सावत्र आई १६ वर्षांच्या मुलीला घेऊन थेट बांगलादेशामधून पुण्यात येते... अवघ्या २0 हजारांत तिचा सौदा करून दलालाच्या हाती सोपवून निघून जाते... बलात्कार आणि अत्याचार

Bangladeshi girls trafficking center Pune | बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र पुणे

बांगलादेशी मुलींच्या तस्करीचे केंद्र पुणे

पुणे : एक सावत्र आई १६ वर्षांच्या मुलीला घेऊन थेट बांगलादेशामधून पुण्यात येते... अवघ्या २0 हजारांत तिचा सौदा करून दलालाच्या हाती सोपवून निघून जाते... बलात्कार आणि अत्याचार सहन केलेल्या या युवतीची एका जागरूक नागरिकामुळे सुटका होते. ही घटना उघडकीस आली खरी; पण अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून गेली आहे. थेट बांगलादेशामधून पुण्यासारख्या शहरांमध्ये होणारी अवैध मानवी वाहतूक ही गंभीर बाब आहे. गरिबीमुळे ‘लैंगिक गुलामगिरी’ला बळी पडणाऱ्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी कीड पुण्यासारख्या शहरातही पाय पसरू लागली आहे.

गेल्या तीन वर्षांत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत अनेक बांगलादेशी महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. प्रेमाचे नाटक करून, चांगल्या कामाच्या आमिषाने फसवून आणलेल्या महिलांचेच प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. या तस्करीला जशी बांगलादेशातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कारणीभूत आहे, तशीच आपल्या देशातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांची ‘अर्थपूर्ण’ डोळेझाकही कारणीभूत आहे.
बांगलादेशात कमालीची आर्थिक हलाखी आहे. तेथे वेश्याव्यवसाय कायदेशीर करण्यात आलेला आहे. बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागामधून चोरटी मानवी वाहतूक केली जाते. भारतामध्ये कामगार, बांगलादेशी नागरिक, महिला, मुली, लहान मुले पाठवणे हा बांगलादेशातील एक मोठा व्यवसाय झाला आहे. सेक्स, गरिबी आणि ड्रग्ज ही बांगलादेशी समाजासमोरील एक मोठी समस्या आहे. गरिबीमुळे अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ओढले जात आहे. येथे लैंगिक गुलामगिरीच्या अनेक मुली बळी पडल्यात. महिलांचे जीवन उघड्यावर पडल्याचे चित्र आहे. तेथील वस्त्या नावाला असून, कुंटणखान्यांची बजबजपुरी बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये माजलेली आहे. दोन्ही देशांतील सीमावर्ती भागातील सुरक्षा यंत्रणा, पोलीस यांचे हात ओले केले की छुप्या पद्धतीने भारतात या सर्वांना प्रवेश मिळतो. अलीकडच्या काळात हे प्रमाण बरेच वाढले आहे.
बांगलादेशामधून होत असलेल्या महिला आणि मुलींच्या तस्करीचा फटका केवळ तेथील सर्वसामान्यांनाच बसतो आहे असे नाही. तीन वर्षांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी केलेल्या कारवाईमध्ये चक्क बांगलादेशातील एका अतिमहत्त्वाच्या लष्करी अधिकाऱ्याच्या नातेवाईक असलेल्या दोन मुलींची सुटका केली होती.

तब्बल : ३५० मुलींना भारतात विकल्याचे निष्पन्न
बांगलादेशामधून या मुलींचे अपहरण करून त्यांना पुण्यामध्ये आणून विकण्यात आले होते. ही माहिती ‘रॉ’मार्फत पोलिसांना कळवली गेली. बर्गे आणि त्यांच्या पथकाने दिवसरात्र एक करीत एका मुलीचा शोध घेतला होता. या मुलीला बुधवार पेठेतील एका इमारतीवरील पाण्याच्या टाकीमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. तर तिच्या बहिणीला हडपसरजवळच्या एका बंगल्यामध्ये लपवून ठेवण्यात आले होते. या दोन्ही मुलींची सुटका करून त्यांना मायदेशी परत पाठवण्यात पोलिसांना यश आले होते. पोलिसांनी बेकायदा वेश्याव्यवसायाच्या कारवाईमध्ये अटक केलेल्या ‘राजू नेपाळी’ नावाच्या आरोपीने तर तब्बल साडेतीनशे मुलींना भारतात विकल्याचे सांगितले होते.
बांगलादेशातील गरिबीमुळे तेथे रुपयाची किंमतही मोठी आहे. अवघ्या पाच ते दहा हजारांतसुद्धा महिलांची विक्री केली जात असल्याची उदाहरणे आहेत. सावत्र आईने तिच्या मुलीला २0 हजारांत विकले होते. तर बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्याच्या नातेवाईक मुलींनाही २0 हजारांतच विकण्यात आले होते. नाइलाजास्तव स्वेच्छेने या व्यवसायात आलेल्या महिलांची संख्याही तशी लक्षणीय आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

‘हाय प्रोफाइल’ वेश्याव्यवसायाचे प्रमाण वाढले... 
पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यागृहांमध्ये बांगलादेशी, नेपाळी आणि दक्षिण भारतीय महिलांचे प्रमाण मोठे आहे. या भागातील महिलांची संख्या घटत चालली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पुण्यातील ‘हाय प्रोफाइल’ वेश्याव्यवसायाचे प्रमाण वाढले आहे. घरपोच सेवा देणे, मोबाईल कॉल, इंटरनेट आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधल्यास या महिला उपलब्ध करून देण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.
अवैध मानवी वाहतुकींमध्ये लहान मुलांचे तसेच स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. लहान मुलांचा वापर बालमजुरी, अंधश्रद्धा तसेच अनैसर्गिक कृत्यांसाठी तर स्त्रियांचा वापर वेश्याव्यवसाय, अश्लील चित्रफीत बनविण्यासाठी, तसेच लग्नासाठी परराज्यात विक्रीसाठी करण्यात येत आहे. नेपाळ, बांगलादेश यांसारख्या सीमेवरील राज्यात ही मानवी अवैध वाहतूक आजही राजरोसपणे चालते. मानवी अवैध वाहतूक हा ज्वलंत सामाजिक प्रश्न असून, याबाबत समाजामध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.
बांगलादेशामधून भारतात आल्यानंतर दलाल या महिलांना घेऊन कोलकात्यामध्ये येतात. येथून आझाद हिंद एक्स्प्रेसने पुण्यामध्ये या महिलांना आणले जाते. पुणे स्टेशनवर दलालांचे ‘डील’ होते. किरकोळ भावामध्ये अल्पवयीन मुलींपासून महिलांपर्यंत सर्वांची विक्री हे नित्याचे व्यवहार झाले आहेत. या एक्स्प्रेसवर लक्ष ठेवून पूर्वी कारवाई केली जात असे. मात्र अलिकडच्या काळात या कारवाया थंडावल्या आहेत.

Web Title: Bangladeshi girls trafficking center Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.