घुमानमध्ये रंगणार मराठीसह पंजाबी भांगड्याचा ‘बल्ले बल्ले’
By Admin | Updated: March 29, 2015 00:29 IST2015-03-29T00:29:29+5:302015-03-29T00:29:29+5:30
लोकनृत्याला पंजाबी संस्कृतीची ओळख असलेल्या बल्ले बल्लेच्या जोशपूर्ण भांगड्याचा अतिशय सुंदर मिलाफ अनुभवायला मिळणार आहे.

घुमानमध्ये रंगणार मराठीसह पंजाबी भांगड्याचा ‘बल्ले बल्ले’
पुणे : घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मराठी मातीतील गाणी आणि लोकनृत्याला पंजाबी संस्कृतीची ओळख असलेल्या बल्ले बल्लेच्या जोशपूर्ण भांगड्याचा अतिशय सुंदर मिलाफ अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये मराठी आणि पंजाबी संस्कृतीला जोडणारे लोककला, लोकनृत्य आणि कीर्तनपरंपरेवरील खास कार्यक्रमांचेही सादरीकरण होणार आहे.
संमेलनातील श्री गुरुनानक देवजी सभामंडपात चार एप्रिल रोजी सायंकाळी ‘महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा’ हा मराठी आणि पंजाबी संस्कृतींशी मेळ घालणारा विशेष कार्यक्रम पुण्याच्या पायलवृंद या संस्थेच्या निकिता मोघे सादर करणार आहेत.
त्यामध्ये प्रसिद्ध मराठी रॉक स्टार गायक अवधूत गुप्ते, नाट्य अभिनेत्री फैयाज, गायक उपेंद्र भट, अभिनेते मोहन जोशी, गायक त्यागराज खाडिलकर, राहूल घोरपडे, सावनी रवींद्र, भार्गवी चिरमुले, शर्वरी जमेनीस, अश्विनी एकबोटे आणि स्मिता तांबे यांचा समावेश असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री-दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी करणार आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमाची संहिता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांची असून, दिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. (प्रतिनिधी)
’भांगडा’ हा नृत्यप्रकार आनंद व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम असून, पतियाळा येथील नौरजोन कल्चरल सेंटरतर्फे संपूर्ण संमेलनातच वेळोवेळी पंजाबी भांगड्यासह पंजाबी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- बलराज सिंग
(पंजाब पर्यटन विभाग उपसंचालक)
1 संत परंपरा, ज्ञानपीठकार, लोककला लोकनृत्य आणि देशभक्तिपर गीते अशा चार भागांत या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यापैकी लोकगीत आणि लोकनृत्यांमध्ये जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा मोठ्या जल्लोषात सादर होणार आहे.
2 दिलहारा हाय हे सध्या लोकप्रिय असणारे पंजाबी गाणे सावनी रवींद्र सादर करणार असून, मै तेनू समझावाकी, हे दुसरे पंजाबी गीतही गायले जाईल. याशिवाय शर्वरी जमेनीस यांचे स्त्रीभूणहत्येवरील नृत्य आणि ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’मधील काही भागांचे अभिवाचन अश्विनी एकबोटे करणार आहेत.